दैनिक राजस्व
अशोक सोनकंटले
दक्षिण सोलापूर प्रतिनिधी
ओमीक्रोन व्हेरियंटचे रुग्ण कर्नाटकात आढळल्याने सोलापूर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. सोलापूर विजयपूर महामार्गावरील टाकळी येथे आंतरराज्य सीमेवर कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांची मागील चार दिवसापासून तपासणी सुरू करण्यात आली आहे. आरटीपीसीआर टेस्ट व दोन लसीकरण झालेल्या प्रवाशांनाच महाराष्ट्रात सोडले जात आहे.ही तपासणी चोवीस तास राहील
अशी माहिती मंद्रूपचे अपर तहसीलदार राजशेखर लिंबारे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक डाॅ.नितीन थेटे यांनी दिली.
अपर तहसीलदार लिंबारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. थेटे, नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, आरोग्य विभागाचे कर्मचारी आज सकाळीच टाकळी येथील तपासणी नाक्यावर आले. त्यांनी कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी सुरू केली.
संपूर्ण देशात चर्चेचा विषय असलेल्या कोरोना ओमीक्रोन व्हेरियंटचे गुरुवारी दोन रुग्ण कर्नाटकात आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली. त्यामुळे सोलापूर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले. सोलापूर जिल्ह्यात कर्नाटकातुन येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट आणि लसीकरण बंधनकारक करण्यात आल्याची माहिती काल सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली होती. त्यांनी कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रमुख महामार्गावर तपासणी नाके सुरू करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार तहसीलदार लिंबारे व सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.नितीन थेटे यांनी टाकळी येथे तपासणी सुरू केली आहे. महसूल विभागाचे कर्मचारी आणि
मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पाच ते सहा कर्मचारी या तपासणी नाक्यावर आहेत. दिवस-रात्र येथे कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांना त्यांची तपासणी करूनच महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश दिला जात आहे. ज्यांनी लसीकरण केले नाही किंवा टेस्ट रिपोर्ट निगेटिव नाही,ज्यांनी मास्क परिधान केले नाही त्यांना परत पाठविले जात होते. सध्या महाराष्ट्र राज्यातील एसटीचा संप सुरू असल्याने कर्नाटकातील अनेक बसेस टाकळी येथूनच परत जात आहेत.त्यामुळे त्याचा मोठा परिणाम प्रवाशांना देखील होत आहे.