भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढत आहे. कोविड-१९ पहिल्यापेक्षा अधिक व्यापकतेने पसरत चालला आहे. आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, संभाव्य तिसरी लाट टाळता न येण्यासारखी असेल. अपरिहार्यपणे, त्याचा सामना आपल्याला करावा लागेल.
सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी बुधवारी इशारा दिला की, कोरोनाच्या विषाणूमध्ये आणखी बदल होत आहे. त्यामुळे येणाऱ्या नव्या लाटेसाठी आपण लढण्यास तयार असणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र सरकारला कोविड-१९ तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. देशभर ऑक्सिजनच्या वितरणासाठीचे पुन्हा नियोजन करण्यास सांगितले.
महत्त्वाचे म्हणजे, आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधा कमी पडत आहेत. म्हणून आपण प्रत्येकानेच जबाबदारीने सुरक्षेचे नियम आणि कोरोनाचे मार्गदर्शक तत्त्व पाळणे गरजेचे आहे. यासाठी पुढील १० गोष्टी तुम्हाला माहिती हव्या-
१) देशातील अव्वल वैज्ञानिक सल्लागारांनी देशात संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.
२) तिसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रसार अपरिहार्य आहे. जो सहजासहजी रोखता येणार नाही. त्यामुळे, नव्या लाटेशी संघर्ष करण्यासाठी आपल्याला सज्ज राहायला लागणार आहे.
३) तिसरी लाट कधी आणि केव्हा येईल, हे स्पष्ट सांगता येत नाही.
४) पहिल्या लाटेत व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती वाढवणं गरजेचं आहे. लसीकरणाचा चांगला परिणाम झालेला दिसून आला आहे.
५) कोरोनाचा प्रसार नव्या बदलांना आव्हान देत आहे.
६) विषाणूची गंभीर परिस्थिती पाहता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आपण शक्य तितकं प्रयत्न करणे आवश्यक आहे.
७) तिसऱ्या लाटेत जोपर्यंत मानवामध्ये विषाणूचे संक्रमण आहे, तोपर्यंत विषाणू नष्ट होऊ शकत नाही. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षितता आणि लसीकरण अत्यंत महत्त्वाचं होय.
८) तज्ज्ञ म्हणतात, आता आपला व्यवहार बदलण्याची गरज आहे. जसे की मास्क वापरणे, सॅनिटायजर वापरणे वगैरे. कोरोनाला हरवून अनुकूल परिस्थिती बनवण्यासाठी आपल्याला प्रयत्नांवर जोर देणं गरजेचं आहे.
9) कोरोनाच्या विषाणूचे संक्रमण मानवातून – मानवामध्ये पसरतो. विजय राघवन म्हणतात, मास्क वापरणे आणि डिस्टन्स पाळणे हे खूप महत्त्वाचे आणि परिणामकारक आहे.
१०) वैयक्तिक स्वच्छता, मास्क-डिस्टन्सिंग, लसीकरण आणि कंटेन्मेंट हे तीन स्तंभ विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी महत्वाचे आहेत.
भारतात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट गंभीर आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, मागील २४ तासांत भारतात ४ लाख, १४ हजार १८८ नवे कोरोना बाधित रुग्ण समोर आले आहेत. ३ हजार ९१५ रुग्णांचा मृत्यू झाला. ३ लाख ३१ हजार ५०७ जणांनी कोरोनोवर मात केली आहे.