पंढरपूर | राज्यात सध्या निवडणूकीचे वारे वाहात आहेत. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीची रणधुमाळी पसरली आहे. भाजप, राष्ट्रवादी जोरदार तयारीला लागलेले दिसत आहेत. आज (११ एप्रिल) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंढरपूर मंगळवेढ्यात राष्ट्रवादीचे उमेदवार दिवंगत भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांच्या प्रचारादरम्यान भाषण केले. दरम्यान, जयंत पाटील यांच्या आजच्या या भाषणाची आठवण शरद पवारांच्या एका ऐतिहासिक भाषणाची आठवण करुन देणारी होती. कारण आज जयंत पाटील यांनी भर पावसात भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी भाषण केलेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही साताऱ्यात भर पावसात भाषण दिले होते आणि सगळ्यांच्या मनांत अढळ स्थान निर्माण केले होते.
आज जयंत पाटलांनीही शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवत कार्यकर्त्यांसाठी ऊन, पाऊस न बघतां त्यांच्या मागे खंबीरपणाने उभे राहिले असल्याची पावती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांना कोरोना झाला होता. त्यातून बरे झाल्यानंतर लगेचच त्यांनी कामाला अगदी धडाक्याने सुरुवात केलेली पाहायला मिळाली. आजचे त्यांचे पावसातील हे भाषण म्हणजे शरद पवारांच्या पावसातील त्या भाषणाची पुनरावृत्तीच दिसून आली आहे.
१८ ऑक्टोबर २०१९ चे साताऱ्यातील सभेत शरद पवारांचे पावसातील भाषण
महाराष्ट्राची १४ वी विधानसभा निवडणुक अनेक अर्थांनी प्रचंड गाजली होती. या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजप-शिवसेनेत केलेले पक्षांतर, या पार्श्वभूमीवर ढवळून निघालेले राज्यातील राजकारण, दिग्गज राजकीय नेत्यांचे एकमेकांवरचे टोकाचे आरोप-प्रत्यारोप, भाजप-शिवसेनेची वाढलेली ताकद, अन्य पक्षांची अस्तित्त्वाची लढाई असे बरंच काही या निवडणुकांच्या अनुषंगाने पाहायला मिळाले. याचदरम्यान, प्रचंड गाजली ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यातील भर पावसातली प्रचारसभा.
काय म्हणाले होते पवार त्या भाषणात?
“लोकसभेमध्ये माझ्याकडून चूक झाली, हे मी जाहीर सभेत मान्य करतोय,” असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्याचे माजी खासदार आणि भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला होता. “एखाद्या माणसाकडून चूक झाली की, त्याने ती चूक कबुल करायची असते. लोकसभेमध्ये उमेदवार निवडण्यामध्ये माझ्याकडून चूक झाली, हे मी जाहीर सभेत मान्य करतोय, पण आता ती चूक सुद्धरविण्यासाठी साताऱ्यातील घराघरातील प्रत्येक तरुण आणि वडील धारी व्यक्ती २१ तारखेची वाट बघत आहे. आपल्या मतांनी निर्णय देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना भरगोस मतांनी विजयी करण्याचे भर पावसात सभा संबोधित करत उपस्थितांना आवाहन केले होते ”