महाराष्ट्र

अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा मी सुद्धा सहभागी होईन

बदली घोटाळा, सचिन वाझे, हिरेन मृत्यू प्रकरणावरुन राज्य सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल केलेला असतानाच महाविकास आघाडीमधील एका मंत्र्याने थेट उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचं आवाहन समर्थकांना केलं आहे. आरक्षणासंदर्भात भाष्य करताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी थेट उपमुख्यमंत्री अझित पवार यांच्या घरावर मोर्चा काढा, मी सुद्धा त्यामध्ये सहभागी होईल असं वक्तव्य केलं आहे. राऊत यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील बिघाडी सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
दलित आणि मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आऱक्षणासंदर्भात कोणताही निर्णय राज्य सरकारडून घेतला जात नाहीय. मंत्रालयामधील काही झारीमधील शुक्राचार्य कुणाच्या तरी दाबावाखाली येऊन या निर्णयासंदर्भात अडवणूक करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. याच पदोन्नतीसाठी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असणाऱ्या अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढण्याचं आवाहन राऊत यांनी काँग्रेसच्या अनुसूचित जाती, जमातीच्या सेलमधील कार्यकर्त्यांना केलं आहे. इतकचं नाही तर आपणही या मोर्चामध्ये सहभागी होऊ असंही राऊत कार्यकर्त्यांसमोर बोलताना म्हणाले आहेत.
महाराष्ट्र काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागामार्फत सोमवारी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आय़ोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात निर्णय होत नसल्याबद्दल नाराजी उघडपणे बोलून दाखवली. त्यावेळी राऊत यांनीही या आरक्षण समितीसंदर्भातील आपली नाराजी कार्यकर्त्यांना बोलून दाखवली. ओबीसींच्या प्रश्नांवरील उपसमितीचे अध्यक्षपद ओबीसी मंत्र्याला दिलं जातं. मराठा आरक्षणासंदर्भातील उपसमितीचं पद मराठा मंत्र्याला देण्यात आलं. मात्र पदोन्नत्तीसंदर्भातील उपसमितीचे अध्यक्ष पद दलित मागास वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्र्यास न देता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आलं आहे. असं कसं काय?, असा प्रश्नच राऊत यांनी या बैठकीत उपस्थित केल्याचं वृत्त टीव्ही ९ ने दिलं आहे.
पुढे बोलताना राऊत यांनी दलित-मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाचा प्रश्न अजुनही सुटलेला नाही असं सांगत नाराजी व्यक्त केली. या पदोन्नतीसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदी अजित पवारांसारखा मोठा नेता असूनही हा तिढा सुटत नसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. हा तिढा कायम असल्याने दलित सामाजामध्ये नाराजीची भावना असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे. आधीच समितीचं अध्यक्षपद हे दलित मंत्र्याऐवजी अझित पवारांकडे देण्यात आल्याने दलित सामाजात नाराजी आहे त्यात अद्याप हा निर्णय झालेला नाही त्यामुळे हा आगीत तेल ओतण्याचा प्रकार असल्याचं सांगत राऊत यांनी थेट अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं.
याच प्रकरणावरुन भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी ट्विटरवरुन महाविकास आघाडीच्या कारभारावर निशाणा साधला आहे. “हे बघून कोण म्हणेल हे सरकार आहे?? एक मंत्री दुसऱ्या मंत्री वर मोर्चा काढा म्हणतायत. हे सरकार कधीच महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेऊ शकत नाही कारण सरकार मधल्या मंत्र्यानीच एक दुसऱ्याची जिरवायला सुरुवात केली आहे,” असं ट्विट राऊत यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातील बातमीवर प्रतिक्रिया देताना केलं आहे.

Related posts