पंढरपूर

पंढरीत जिल्हा पोलीस प्रमुखाच्या पथकाकडून वाळू माफियांवर कारवाई

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर शहरातील भीमा नदी काठावर सध्या वाळू माफियांचा राजरोसपणे अवैध व्यवसाय सुरू आहे. शहरातील महसूल प्रशासन व पोलिस प्रशासन सक्रिय असतानाही अशा अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने अखेर सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख च्या पथकांना पंढरपुरात येऊन कारवाई करावी लागत आहे. पंढरीतील नदी काठ परिसरात अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांवर रात्री साडे अकराच्या सुमारास जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात अलगद सापडले अन् कारवाई करण्यात आली. यामध्ये सुमारे १२५ ब्रास वाळूचा साठा तसेच वाळू वाहतूक करण्यासाठी वापरलेली चार चाकी वाहने दोन दुचाकी मिळून ३८ लाख ७९ हजार पाचशे रुपये चा मुद्देमाल सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या पथकाने हस्तगत केला. या घटनेत सात जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ही घटना समजतात पंढरपूर शहर व तालुक्यातील वाळूमाफिया मध्ये एकच खळबळ उडाली.

या घटनेची पोलीसांकडून समजलेले अधिक माहिती अशी इसबावी परिसरात असलेल्या जॅकवेल जवळ मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा व वाहतूक केली जात असल्याची माहिती सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या ग्रामीण पोलीस पथकाला मिळाली या माहितीच्या आधारे २६ ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पथकाने सापळा रचला असता जॅकवेल इसबावी जवळ भीमा नदी पात्र येथून वाळू वाहनात भरून शासनाचे संमतीशिवाय विनापरवाना वाळू चोरून घेऊन जात असल्याचे दिसून आले. यावेळी पोलीस पथकाने केलेल्या कारवाईत लखन शिवाजी घंटे, सचिन शंकर शिंदे दोघे राहणार सह्याद्री नगर इसबावी,विजय मधुकर मेटकरी राहणार देवकते मळा, राम नारायण शिंदे राहणार वाखरी, विजय अशोक पवार राहणार जुनी वडार गल्ली, गणेश सुभाष झाडबुके राहणार संत पेठ, राहुल भारत धोत्रे राहणार जुनी वडर गल्ली या सात जणांनी संगणमत करून चंद्रभागा पात्रातून वाळू चोरून घेऊन जात असताना मिळून आले. यांच्या कडून सुमारे १२५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. या घटनेत वापरलेले वाहन क्रमांक एम वाय ए /ए २५११ क्रमांकाचा ४०७ टेम्पो त्यामध्ये १ ब्रास वाळू तसेच महिंद्रा पिकप वाहन क्रमांक एम एच १३/आर ०५५९ यामध्ये अर्धा ब्रास वाळू भरलेली तसेच एक हिरो होंडा स्प्लेंडर क्र. एम एच १३/ए वाय ५१२४ व हिरो होंडा पॅशन प्रो क्र.एम एच १३/बी ए ४५५५ अशी दोन दुचाकी वाहने आरोपींकडून ताब्यात घेण्यात आली. या सर्व मुद्दे मालाची अंदाजे किंमत ३८ लाख ७९ हजार पाचशे रुपये असून याबाबत पोलीस कॉन्स्टेबल कल्याण विठ्ठल भोईटे नेमणूक सोलापूर ग्रामीण मुख्यालय यांनी फिर्याद दाखल केली असून वरील सात आरोपींविरुद्ध भा दं वि कलम ३८९,३४ गौण खनिज कायदा १९७८ चे कलम ४(१)४(क)(1),२१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.

Related posts