Blog उस्मानाबाद  परंडा

धार्मिक वारसा संपन्न उस्मानाबाद जिल्हा ; श्री क्षेत्र काळभैरवनाथ मंदिर,सोनारी.

परंडा प्रतिनिधी – रणजीत पाटील

श्री क्षेत्र काळभैरवनाथ मंदिर सोनारी , परंडा तालुक्यात आहे.
कालभैरवनाथ हिंदूंचे एक कुलदैवत आहे. हा शंकराचा अवतार असून कालभैरव, काळभैरवनाथ, काळभैरी, भैरव, भैरवनाथ, बहिरीनाथ, भैरी(नाथ), भैरोबा, ही त्याची अन्य नावे आहेत. महाराष्ट्रात काळभैरव व भवानी ही अनेक कुटुंबांची कुलदैवते आहेत. काळभैरव-जोगेश्वरी, भैरी-भवानी, भैरी-जोगेश्वरी अशी दैवते कुलस्वामी व कुलस्वामिनीच्या स्वरूपांत पूजली जातात. भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे. त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते, असे सांगितले जाते.


काळभैरवनाथ मंदिर ,सोनारी

महाराष्ट्रातील नाथ संप्रदायाचे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ सोनारी हे ठिकाण उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ८७ किमी. तर परांडा या तालुक्याच्या ठिकाणापासून १५ किमी. अंतरावर सीना नदीजवळ वसलेले आहे.

‘सोनारी’ या नावाविषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्यानुसार काळभैरवनाथांनी भद्रकाली देवीच्या सहकार्याने सुवर्णासुर नावाच्या राक्षसाचा या ठिकाणी वध केला होता. त्यामुळे या ठिकाणाचे नाव ‘सुवर्णपूर’ पडले. पुढे सुवर्णपूर या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्याचे नाव ‘सोनारी’ झाल्याची आख्यायिका भैरवनाथ माहात्म्यात दिलेली आहे. संत रामदासस्वामींचे शिष्य कल्याणस्वामींनी भैरवनाथ माहात्म्य लिहिल्याचे म्हटले जाते. कल्याणस्वामींचे वास्तव्य सोनारीपासून ४.२ किमी. वर असणाऱ्या डोमगाव येथे होते. तेथे त्यांची समाधी आहे. अनेक भाविक सोनारी या तीर्थक्षेत्रास ‘सोनारसिद्ध’ या नावानेही ओळखतात.
सोनारी येथे काळभैरवनाथ मंदिराबरोबरच नाथ संप्रदायाचा एक भैरवनाथ मठही आहे. या मठाची स्थापना चौदाव्या शतकात झाली असावी. या मठाला मध्ययुगात अनेक इनामे दिली गेली. काळभैरवनाथ मंदिर व सोनारी या स्थानाशी नाथ संप्रदायाचा असणारा कागदोपत्री संबंध पंधराव्या शतकापर्यंत मागे नेता येतो. याबाबत १७९४ मधील महादजी शिंदे यांचे निवाडापत्र, तसेच १७९५ सालचे सवाई माधवरावांचे आज्ञापत्र उपलब्ध आहे. महादजी शिंदे यांनी दिलेल्या निवाडापत्रात या स्थानाची माहिती भैरवनाथ मठाच्या अनुषंगाने आलेली आहे. सदर निवाडापत्रानुसार येथील भैरवनाथ मठातील चौक, पूजा, पातर इ. पुजाविधींचे अधिकार मिळविण्यासाठी नाथ संप्रदायातील मलिक जोगी (राऊळ) शाखेचे नाथ-योगी व डवरी कानफाटे गोसावी यांच्यामध्ये वाद-विवाद होते. या वाद-विवादांची मालिका १४७५ पासून १७९४ पर्यंत चालू राहिली. यातील दोन्ही पक्षकारांनी यावेळी आपल्याकडील पुराव्यांची जंत्रीच सादर केली होती. प्रारंभी १४७५ साली बहमनी राजवटीत नाथ संप्रदायातील रावळ शाखेतील एका परिवारात अवधूतनाथ व निंबनाथ यांच्यामध्ये पूजाविधीसाठी वरिष्ठ व कनिष्ठ पदावरून वादाची ठिणगी पडली. दोन्ही पक्षकार स्थानीय पंचायतीत गेले. त्यानंतर तेथे समाधान न झाल्याने हा वाद अंबाजोगाई येथील जात पंचायतीत (पंढरी) मिटविण्यात आला.

इ. स. १६६८ मध्ये पुन्हा हा वाद उफाळून आला. यावेळी भैरवनाथ मठाचे व्यवस्थापन रावळ शाखेचे तुकनाथ यांच्याकडे होते. काही कारणास्तव त्यांना मठ व्यवस्थापनेपासून दूर राहावे लागले. त्यांच्या अनुपस्थितीत दोन कानफाटे जोगी बरावनाथ व बुधनाथ सोनारीला आले व पूजापाठ विधी करू लागले. त्यांनी क्रमशः बहिराई व मंगलाई यांच्याशी विवाह केला. या दोघींनी स्वतःचे कर्ण संस्कार करवून घेऊन मठातील पूजा विधी करण्यास सुरुवात केली. या दरम्यान तुकनाथ वापस आले व त्यांनी आपल्या वतनाची मागणी केली. न्यायालयात निकाल त्यांच्याकडून लागला. १७५६ साली या संबंधीचे एक थालपत्र पैठणकरांनी राऊळ मलिक जोगींच्या नावे करून दिले होते. पुढे जानोजी जसवंत निंबाळकरांनी यासंबंधी कौल दिला होता. परंतु परिस्थिती अधिकच चिघळत चालल्याने पुण्यातील पेशव्यांना या प्रकरणात भाग घ्यावा लागला. अखेर १७९४ साली राऊळांची बाजू ग्राह्य धरून महादजी शिंदे यांनी निवाडापत्र जारी केले.
महादजी शिंदे यांचे हे निवाडापत्र ऐतिहासिक दस्तऐवज आहे. सदर पत्रात ‘पातर’ पूजेचा उल्लेख आलेला आहे. ही पातर पूजा म्हणजेच आज नाथ संप्रदायात प्रचलित असलेली ‘पात्र पूजा’ असावी. नाशिक-त्रिंबकेश्वर येथील कुंभमेळ्यानंतर नागपंचमीच्या दिवशी त्रिंबकेश्वर येथून हजारो नाथ-योगी पात्रदेवतेसोबत कर्नाटकातील कदरीपर्यंत पदयात्रा करतात. यावेळी नाथ संप्रदायाच्या विभिन्न मठातील महंतांची नव्याने नेमणूक केली जाते. ही नेमणूक १२ वर्षे म्हणजेच नाशिक येथील पुढच्या कुंभमेळ्यापर्यंत वैध असते. याच नवनाथ झुंडी यात्रे दरम्यान झुंडीतील काही नाथ-योगी सोनारी येथे येऊन भैरवनाथ मठाच्या नवीन महंताची नेमणूक करतात. ही परंपरा काही शतके जुनी मानली जाते. त्यामुळे महादजी शिंदे याच्या निवाडापत्रावरून नवनाथ झुंडीची परंपरा कमीतकमी पंधराव्या शतकापासून तरी प्रचलित असावी, असे दिसते.


सुवर्णतीर्थ (बारव) सोनारी

काळभैरवनाथ मंदिरात प्रवेश करण्यासाठी पूर्वेकडील एका विशाल प्रवेशद्वारातून जावे लागते. येथे नगारखाना आहे. प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर बाजूलाच एक लाकडी सुंदर रथ दिसतो. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एक विशाल ‘पुष्करणी’ (बारव) आहे. त्यात उतरण्यासाठी दोन मार्ग असून चारीबाजूंनी देवकोष्ट बनविली आहेत. ही बारव ‘सुवर्णतीर्थ’ या नावानेही ओळखली जाते. याच्या स्थापत्य रचनेनुसार ही बारव १५-१६व्या शतकातील वाटते. बारव पार करून गेल्यानंतर समोर दोन उंच दीपमाळ लागतात. दीपमाळांसमोर काळभैरवनाथाचे मंदिर आहे. मंदिराच्या सभामंडपाच्या तुलनेने अंतराळ, गर्भगृह व मंदिराचे शिखर थोडे जुन्या धाटणीचे दिसते. पूर्वी सभामंडपातील स्तंभ लाकडी होते. गर्भगृहात एका उंचवट्यावर काळभैरवनाथ व जोगेश्वरी यांच्या उत्तर मध्ययुगीन दगडी प्रतिमा ठेवल्या आहेत. मूळ प्राचीन प्रतिमा खंडित झाल्याने त्या मंदिरात एका बाजूला ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या चारी बाजूंनी बंदिस्त कुंपण असून पश्चिमेला एक अन्य प्रवेशद्वारही आहे. चैत्र व कार्तिक महिन्यात येथे जत्रा भरते. यावेळी येथील रथातून काळभैरवनाथाची मिरवणूक काढून मंदिरात गुलालाची उधळण केली जाते.

काळभैरवनाथ मंदिराच्या उजव्या बाजूला भैरवनाथ मठ आहे. मठात भद्रकाली देवीची गुफा, धूना, नाथ-योगींच्या समाधी, हिंगलजा मातेचा तांदळा इ. वास्तू व अवशेष दिसतात. या मठात मंदिराच्या उदुंबराचे (उंबरठा) अवशेष येथील एका भिंतीत लावलेले आहेत. त्याच्या मंदारकावर दोन्ही बाजूला दोन कीर्तिमुखे कोरलेली आहेत. बहुधा हे अवशेष मूळ काळभैरवनाथ मंदिराचे असावेत. सध्या या मठाची व्यवस्था ‘अखिल भारतवर्ष नवनाथ झुंड ट्रस्ट’ मार्फत चालते. या मठास स्वतःची दान मिळालेली शेतजमीनही आहे.
विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील ‘मढी’ या तीर्थक्षेत्राप्रमाणे सोनारी येथेही डवरी गोसाव्यांची जात पंचायत भरत असे. सोनारी येथे लोहतीर्थ (लोहाबाई), नागनिर्झरी तीर्थ, बगनाथ मंदिर, चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर, गढीचे अवशेष, वीरगळ, नाथ-योगींच्या समाधी पाहावयास मिळतात.

कालभैरव महात्म्य (अख्यायिका)

महाराष्ट्राच्या पावन भुमित मराठमोळ्या धार्मिकदृष्ट्या महत्वाची जी पुरातन श्रध्दास्थाने आहेत, त्यातील महत्वाचे तीर्थ क्षेत्र म्हणजे सोनारी येथील सिद्धनाथ म्हणजेच श्री काळभैरवनाथ होय. ओंकाररुप असलेल्या श्री क्षेत्र सोनारी येथील श्री काळभैरवनाथाचे महात्म्य अनादिकालापासुनचे आहे. भैरवनाथाचा जन्म भगवान श्री शंकराच्या तृतीय नेत्रातून झाला अशी अख्यायिका आहे. नाशिक त्र्यबकेश्वरापासुन ते सुवर्णपुरी (सोनारी)पर्यंत हा भाग पुर्वी दंडकारण्याचा भाग होता श्रमहरीणी नदीच्या तिरावर महान तपस्वी ऋषि-मुनींच्या गुंफा होत्या ते सर्वध्यान-धारणाजप-तप करीत असत,परंतु याच दंडकारण्यात दैत्यांचे वास्तव्य होते. त्यांनी ब्रम्हदेवाची तपश्वर्या करुन अविवाहिताच्या हातुन मृत्यु नसावा असा वर घेतला. या वराचे आधारे ते मदोन्मत झाले ऋषि मुनींना त्रास देऊ लागले, धार्मिक कार्यात अडथळे करू लागले. त्यामुळे ऋषि मुनींनी ब्रम्हदेवाकडे गाऱ्हाणे केले की, आमच्या कार्यात अडथळा निर्माण करणाऱ्या दैत्याचा बंदोबस्त करा. ब्रम्हदेवाने त्यांना श्री शंकराची आराधना करायला सांगितली ऋषि-मुनींनी तिची घोर तपश्चर्या केली. शंकर प्रसन्न झाले त्यांनी सांगितले ठराविक काळानंतर माझ्या त्रीनेत्रातुन काळभैरवनाथाचा अवतार निर्माण होईल व तो दैत्यांचा संहार करेल. कार्तिक वद्य जन्माष्टमीस रात्री १२वा. काळभैरवनाथाचा जन्म शंकाराच्या तृतीयनेत्रातुन झाला.

शंकराच्या आज्ञेप्रमाणे भैरवनाथ सुवर्णपूरी (सोनारी) कडे दैत्यांचा संहार करण्यासाठी निघाले, परंतु ब्रम्हदेवाचे दैत्यांना अविवाहीताच्या हातुन मृत्यु येऊ नये व एकरक्ताच्या थेंबापासुन अनेक राक्षस निर्माण होतील असा वर होता त्यामुळे भैरवनाथाना लग्न करणे आवश्यक होते. ठराविक घटकेतच लग्न केले तरच मी थांबेन या अटीवर श्री भैरवनाथाचा विवाह अंबाजोगाई येथे जागेश्वरी या देवीशी ठरला. परंतु अटी प्रमाणे विवाह न झाल्याने ते पुढे निघुन गेले आजही अंबाजोबाई येथे अर्धवट विवाह सोहळा मुर्तिरुपात पहावयास मिळतो. भैरवनाथ सोनारीला आलेत्या वेळी जोगेश्वरी ने सोनारीपासुन ३ कि.मी. अंतरावर असणाया मुख्य ग्राम येथे शेषाच्या पोटी योगिनी हा अवतार धारण केला व चैत्र वद्य अष्टमीस रात्री १२ वा. भैरवनाथाचा जोगेश्वरीशी विवाह झाला. लग्नानंतर भैरवनाथानी दैत्यांशी युध्द करण्यास सुरूवात केली दैत्यावर वार करताच त्यांच्या रक्ताच्या थेंबापासून अनेक राक्षस निर्माण होऊ लागले. त्यावेळी भैरवनाथानी शंकिनी ,कंकीणी ,इकोनी, रंडा, मुंडाअशा चौसष्ठ योगिनींची आराधना करुन त्यांना प्रसन्न करुन घेतले. भैरवनाथाने राक्षसांवर वार करावयाचा व चौसष्ठयोगिनींनी रक्तजमीनीवर पडू न देता पत्तरवपरडीमध्ये घेऊन वरचेवर प्राशन करावयाचे असे करुन श्रीभैरवनाथांनी सर्वराक्षसांचा नाश केला. युद्ध थांबल्यानंतर शस्त्रधुण्यास पाणी नव्हते. म्हणुन भैरवनाथांनी त्रिशुळ मारून पाणी काढले त्यास लोहतीर्थ(लोहबाई) म्हणून ओळखले जाते. आजही त्या तीर्थात भाविक पापा पासून मुक्ती मिळते या भावनेन स्नान करतात.


भैरवनाथाचा महायात्रारथ

श्री भैरवनाथानी राक्षसांचा नाश केला,याचाच आनंदोत्सव म्हणून दरवर्षी श्री क्षेत्र सोनारी येथे नेवारी येथे चैत्र वद्य अष्टमी पासून ते त्रयोदशीपर्यंत मोती यात्रा भरते. सोनारी येथील भैरवनाथाचे मंदिर फार पुरातन व जागृत असुन हेमाडपंथी पद्धतीचे बांधकाम आहे. मंदिरासमोरच एक माठत तिथ बारा वर्षानंतर काशी येते असी अख्यायिका आहे. त्यातिथ चे पाणी इतर वेळी हिरवे असते पण ज्या वेळी काशीचे आगमन होते. त्यावेळी पाणी काही तासा करीता पांढरे होते. त्यावेळी हजारो भाविक त्यामध्ये येऊन स्नान करतात. मंदिराच्या पाठी मागे काशीबाई तिर्थ असून डाव्या बाजुस नागनिर्झरी तिर्थ आहे. या देवस्थानचा उल्लेख स्कंदपुराणात असुन, भैरव महात्म्य पोथीत यासंबंधी सविस्तर माहिती आहे. सोनारी येथील काळभैरवनाथ हे महाराष्ट्रातील मुळस्थान असून अनेक उपठिकाणे आहेत.काळभैरवनाथ अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे.

Related posts