29.7 C
Solapur
September 29, 2023
महाराष्ट्र

सर्वात जास्त अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात

मुंबई : राज्यात काल दिवसभरात तब्बल 23 हजार 179 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यातही चिंताजनक बाब म्हणजे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोना वेगाने पसरत आहे. यात पुणे, नाशिक, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नांदेड, ठाणे, अमरावती, अकोला जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे अंशतः लॉकडाऊन विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये लावूनही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नसल्यामुळे येणाऱ्या काळात प्रशासन आणि नागरिकांसाठी आव्हान ठरणार आहे.
काल दिवसभरात पुणे जिल्ह्यात तब्बल 4745 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर पंधरा बाधितांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात ही आतापर्यंतची एका दिवसात आढळून आलेली दुसऱ्या क्रमांकाची संख्या आहे. 9455 व्यक्तींची चाचणी केल्यानंतर त्यामधून 4745 व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. या आधी पुण्यात 10 सप्टेंबर 2020 ला 4935 रुग्णांची नोंद झाली होती. राज्यात सध्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक गंभीर परिस्थिती आहे. कारण, रोजच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून तब्बल 32,359 अॅक्टिव्ह कोरोनाबाधित आहेत. राज्यातील ही सर्वाधिक संख्या आहे.
काल नाशिक जिल्ह्यातही कोरोनाबाधितांच्या संख्येत रेकॉर्डब्रेक वाढ पहायला मिळाली. यापूर्वी 16 सप्टेंबर 2020 ला 2 हजार 48 रुग्णांची नोंद झाली होती. तर काल दिवसभरात जिल्ह्यात तब्बल 2 हजार 146 नवे रुग्ण आणि 9 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक शहरात सर्वाधिक बाधित तर ग्रामीण भागातही वाढता प्रादुर्भाव पहायला मिळत आहे. नाशिक शहर – 1296, नाशिक ग्रामीण – 631, मालेगाव मनपा – 174 तर जिल्हा बाह्य – 45 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल 697 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. अॅक्टिव्ह रुग्णसंख्येनेही 10 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या 10 हजार 851 बाधितांवर उपचार सुरु आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातही कोरोनाबाधितांचा आलेख वाढतच चालला आहे. काल जिल्ह्यात एकूण 1335 कोरोनाबाधितांची नव्याने भर पडली, तर 7 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. 442 जणांना (मनपा 357, ग्रामीण 85) घरी सोडण्यात आले. कालपर्यंत 52515 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. काल एकूण 1335 कोरोनाबाधितांती नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 61435 झाली आहे. कालपर्यंत एकूण 1368 जणांचा मृत्यू झाला असून एकूण 7552 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनाचा संसर्ग विदर्भातील नागपूरमध्येही वेगाने पसरताना दिसत आहे. काल 3370 नव्या कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली. यात नागपूर शहरात 2668 तर नागपूर ग्रामीणमधील 699 रुग्ण आहेत. आजवरची नागपूर शहरातील सर्वाधिक रुग्ण संख्येची नोंद झाली आहे. दरम्यान, 1216 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तर कोरोनामुळे 16 जणांना जीव गमवावा लागला. काल 15000 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यामध्ये पॉझिटिव्ह टक्केवारी 22.5% एवढी जास्त आहे. सध्या 21118 अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

मुंबईपाठोपाठ कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या कल्याण-डोंबिवली क्षेत्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. कल्याण-डोंबिवली क्षेत्रात गेल्या एक महिन्यापासून दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या 250 ते 400 च्या घरात होती. पण, काल सर्वाधिक 593 रूग्ण आढळले आहेत. दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्यामुळे पालिकेने काही निर्बंध लागू केले आहेत. पण नागरिक नियम पाळताना दिसत नाही.

Related posts