देशात कोरोनाचे संकट वाढत आहे. मुख्यतः महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लावण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनच्या शक्यतेने शेअर बाजारात निराशेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे आज सोमवारी सकाळच्या सत्रात दिसून आले. सकाळच्या सत्रात शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल १३०० अंकांनी कोसळला. तर निफ्टीदेखील ४०० अंकांनी खाली आला. यामुळे अवघ्या १५ मिनिटांत गुंतवणूकदारांना ७ लाख कोटींचा फटका बसला.
कोरोनाची दुसरी लाट अतिशय गंभीर असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अर्थव्यवस्था आणि बाजारावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १ लाख ६८ हजार ९१२ रुग्ण आढळून आले आहेत. तर ९०४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांचा आकडा १ लाख ७० हजार १७९ वर पोहोचला आहे. कोरोनाचे संकट वाढू लागल्याने त्याचे पडसाद शेअर बाजारात दिसून येत आहेत.
सोमवारी सकाळच्या सत्रात शेअर बाजारात सेन्सेक्स १३९७ अंकांनी खाली जात ४८,१९४ अंकांवर व्यवहार करत होता. तर निफ्टी ४३० अंकांनी घसरत १४,४०४ अंकांवर व्यवहार करत होता.
previous post
next post