महाराष्ट्र

राष्ट्रवादीचं ठरलं! सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मोठी पोकळी झाल्याची भावना निर्माण झाली होती. त्यातून बाहेर येण्यासाठी उपमुख्यमंत्रिपद सुनित्रा पवार यांनी स्वीकारावं अशी मागणी करण्यात येत होती. तसेच राष्ट्रवादीचे प्रमुखपदही त्यांच्याकडेच राहावं यासाठी अनेकजण प्रयत्नशील होते.

विधीमंडळ गटनेत्याची निवड
पक्षाकडून होत असलेल्या आग्रहानंतर सुनेत्रा पवार आता उपमुख्यमंत्रिपद स्वीकरण्यास तयार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या जाहिरातीचे काम पाहणाऱ्या डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. शनिवारी, राष्ट्रवादीच्या विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड होणार आहे. सुनेत्रा पवार यांची त्या पदावर निवड होणार आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक
अजित पवारांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम झाल्यानंतर व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर पाच बड्या नेत्यांची बैठक झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये हा निर्णय झाल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीने घेतलेल्या या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली जाणार आहे. त्यानुसार शनिवारीच सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवार यांच्याकडे अर्थखातं, क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क खातं होतं. ही महत्त्वाची खाती कुणाला द्यायची यावरही खलबतं केली जात आहेत. तसेच सर्वात महत्त्वाचं असलेलं अर्थखातं हे आपल्याकडेच राहावं असा राष्ट्रवादीचा प्रयत्न असेल.

Related posts