महाराष्ट्र

उद्योगांनी कायमस्वरूपी कोविड सुसंगत कार्यप्रणाली तयार करावी : मुख्यमंत्री

कोविडचा झपाट्याने वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे, याशिवाय उद्योगांनी औषधे, बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे, लसीकरणाला वेग देणे अशी या लढाईत शक्य होईल तशी सर्व मदत राज्य सरकारला करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उद्योगांना केले. कोविडची तिसरी लाट आल्यास उद्योग- व्यवसायांचे नुकसान होऊ नये आणि अर्थचक्राला देखील झळ बसू नये म्हणून उद्योगांनी आत्तापासूनच कोविड सुसंगत कार्यपद्धतीचे नियोजन करून तशा सुविधा उभाराव्यात व कार्यप्रणाली अवलंबवावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. यावर प्रतिसाद देतांना कोविडविरुद्धच्या लढाईत संपूर्ण उद्योग विश्व आपल्याबरोबर आहे असा एकमुखाने विश्वास राज्यातील प्रमुख उद्योगपतींनी मुख्यमंत्र्यांना दिला.
उद्योगांचा टास्क फोर्स तातडीने स्थापणार
राज्यात ज्याप्रमाणे आरोग्यविषयक टास्क फोर्स आहे तसेच कोविडसंदर्भात राज्य सरकारच्या समन्वयाने पुढील काळात काम करण्यासाठी उद्योगांचा एक टास्क फोर्स तातडीने निर्माण करावा असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना निर्देश दिले.
उद्योगांनी दिली नि:संदेह खात्री
बैठकीत राज्याची निकड लक्षात घेऊन प्राधान्याने आपापल्या परीने ऑक्सिजनची उपलब्धता तातडीने करून देण्यात येत आहे असे उद्योगांच्या प्रतिनिधींनी सांगीतले. याशिवाय विलगीकरण बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे स्थापन करणे आणि लसीकरण वाढविणे यामध्ये उद्योग पुढाकार घेऊन लगेच कार्यवाही सुरु करतील असेही सांगण्यात आले. सर्व उद्योगपती हे राज्याच्या परिवारातले असून या संकटसमयी त्यांनी पुढे येऊन मदत करावी असे कळकळीचे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की, कोविडसंदर्भातील सुविधा उभारणे किंवा याविषयी आवश्यक त्या बाबींमध्ये राज्य शासन तातडीने मदत करेल.

Related posts