सचिन झाडे –
पंढरपूर, दि. 05 :
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये माहे एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे.
पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने 71 ग्रामपंचायतीसाठी दि.15 जानेवारीला सार्वत्रिक मतदान घेतले जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीत व जबाबदारीने पार पाडावी अशा सूचना तहसिलदार तथा निवडणूक प्रधिकृत अधिकारी विवेक सांळुखे यांनी दिल्या.
पंढरपूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी नवीन शासकीय धान्य गोदाम, अनवली ता.पंढरपूर येथे नियुक्त 1 हजार 736 अधिकारी व कर्मचाऱ्यांची यांना दोन सत्रात प्रशिक्षण देण्यात आले.यावेळी निवडणूक नायब तहसिलदार एस.पी. तिटकारे, नायब तहसिलदार पी.के.कोळी, महसूल सहाय्यक श्री. एस.बी.कदम एस.आर.कोळी,यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामपंचायत निवडणूक नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन, बॅलेट युनिट आदी बाबतची माहिती प्रात्यक्षिकांसह सांगण्यात आली. तसेच मॉकपोल, घोषणापत्रे इतर निवडणूक संदर्भातील नमुने भरण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच ग्रामपंचायत निवडणूक कोरोना संसर्गाच्या कालावधीत होत आहेत. मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाने निर्धारित केलेल्या नियमांची अंमलबजावणी करावी. मतदासाठी मतदाराला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले असल्याचे तहसिलदार तथा निवडणूक प्रधिकृत अधिकारी सांळुखे यांनी सांगितले.
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचे कामकाज जबाबदारीने पुर्ण करावे, या कामकाजात निष्काळजीपणा केल्यास त्यांच्याविरुध्द निवडणूक कायद्यातंर्गत योग्य कारवाई करण्यात येईल असेही तहसिलदार तथा निवडणूक प्रधिकृत अधिकारी सांळुखे यांनी निर्देश दिले.