पंढरपूर

पंढरपूर तालुक्यात परिचारक,भालके,काळे गटांची सरशी ; तर अनेक अपक्ष उमेदवार विजयी.

सचिन झाडे
पंढरपूर / प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींवर परिचारक, भालके, काळे गटाचा झेंडा तर अनेक ठिकाणी अपक्षांना संधी तर पंढरपूर तालुक्यात अवताडे गटाचा प्रवेश झाला असून त्यांचे अनेक ठिकाणी उमेदवार विजयी झाले आहेत.

सोमवारी मतमोजणीसाठी पंढरपूर येथे कार्यकर्त्यांनी तसेच उमेदवारांनी शासकीय गोदाम येथील मतमोजणी ठिकाणा समोरील रेल्वे मैदानात एकच गर्दी केली होती. टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांकडून येथे गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला जात होता.

पंढरपूर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींचे मतदान १५ जानेवारी रोजी झाले होते.त्याची मतमोजणी प्रक्रिया १८ जानेवारी रोजी पार पडली.यामध्ये पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये परिचारक,भालके, काळे,अवताडे गटाकडून उमेदवार उभे करण्यात आले होते. तसेच अनेक परीचारक,भालके, काळे गटातील कार्यकर्त्यांना संधी न मिळाल्याने वरील गटातील कार्यकर्ते अनेक ठिकाणी उभे होते.

तसेच अनेक ठिकाणी परिचारक,भालके, काळे विरुद्ध परिचारक,काळे, भालके गटातीलच कार्यकर्ते भिडले असल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले होते.यामुळे निकालाच्या दिवशी सर्व ठिकाणचे निकाल हाती आल्यानंतर अनेक ठिकाणी परिचारक, भालके, काळे तसेच अवताडे गटाचे ही उमेदवार निवडून आल्याचे दिसून आले.

मात्र अनेक ठिकाणी दिग्गज पुढाऱ्यांना सत्ता गमवावी लागली आहे. यामध्ये सुस्ते येथे ४० वर्षांपासून सत्ता अबाधित ठेवणारे पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप आप्पा घाडगे यांच्या गटाला सत्तेपासून लांब राहावे लागणार आहे. तर रोपळे येथे २५ वर्षांपासून सत्तेत असलेले दिनकर कदम यांना सत्ता गमवावी लागली आहे.तर चिलाईवाडीत विठ्ठलचे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार यांच्या गटाची सत्ता संपुष्टात आली आहे. तर दुसरीकडे भोसे येथे विरोधकांचे डिपॉझिट जप्त करण्यात सत्ताधारी आघाडीचे गणेश पाटील यांना यश मिळाले आहे. तर उपरी येथे परिवर्तन झाले असून काळे,भालके गटाने सत्ता खेचून घेतली आहे. अनवली येथे सिद्धनाथ-जोगेश्वरी स्वाभिमानी महाविकास आघाडीने सत्ता मिळवली आहे.

पंढरपूर येथील शासकीय गोदाम येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी व उमेदवारांनी येथील रेल्वे मैदानात गर्दी केली होती. टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर होताच विजय उमेदवारांकडून गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला जात होता.

Related posts