लातूर / वैभव बालकुंदे
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क लावा, शारीरिक अंतराचे पालन करा, स्वच्छता ठेवा, सॅनिटायझरचा वापर करा, असे संदेश दिले जात आहेत. असे असताना शहराच्या मुख्य रस्त्याला पर्यायी रस्त्याच्या कडेला मात्र कचऱ्याचे ढीग लावले जात आहे. शहरातून गोळा करून आणलेला कचरा येथे टाकला जात आहे. तसेच स्क्रॅप मार्केट ते रिंगरोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर असेच कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत; पण येथून हा कचरा उचलून कचरा डेपोच्या ठिकाणी नेला जात नसल्याने या भागात दुर्गंधी सुटली आहे. स्वच्छतेचे महत्त्व सांगणाऱ्या महापालिकेचे कोरोनाच्या काळात स्वच्छतेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.शहरात घंटागाड्याच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कचरा वेचला जात आहे. खरे तर रोज गोळा करण्यात आलेल्या कचरा हा कचरा डेपोला नेऊन त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेने एका संस्थेचीही नियुक्ती केली आहे. काही दिवसांपासून शहरात घंटागाड्या घरोघरी जाऊन कचरा गोळा करून आणत आहेत.
हा कचरा येथील राजस्थान विद्यालय ते शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला पर्यायी रस्ता असलेल्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला टाकला जात आहे.एकाच ठिकाणी ढीग न करता राजस्थान विद्यालय ते देशी केंद्र शाळेसमोरील पुलापर्यंत रस्त्याकडेल पसरून हा कचरा टाकला जात आहे; तसेच काही वैद्यकीय कचराही या ढिगाऱ्यावर आणून टाकला जात आहे. तसेच येथील स्क्रॅप मार्केट ते रिंगरोड परिसरात देखील असेच कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. त्यात कुत्रे, डुकरामुळे हा कचरा रस्त्यावर येत आहे. रोजच्या रोज हा कचरा उचलून नेण्याची गरज आहे. पण याकडे महापालिकेचे मात्र दुर्लक्ष होत आहे.