कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतात पुन्हा एकदा लॉकडाउन होण्याच्या मार्गावर आहे. जगभरात कोरोनाच्या या नव्या अवतारावर आता जगभर संशोधन सुरू आहे. वैद्यकीय पत्रिका लॅन्सेटच्या अहवालानुसार कोविड-१९ मध्ये आढळणाऱ्या Sars-coV02 हा विषाणू हवेतून पसरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
हा अहवाल प्रसिध्द करणाऱ्या वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणू हवेव्दारे पसरतो. कोरोना महामारीच्या सुरूवातीच्या काळामध्ये एखादी कोरोना बाधित व्यक्तीच्या शिंकण्यामुळे किंवा खोकल्यामुळे त्याच्या तोंडातून बाहेर पडणारी थुंकी जर दुसऱ्या व्यक्तीच्या अंगावर उडली तर संबंधीत व्यक्ती बाधित होतो असे म्हटले जात होते. मात्र या नव्या संशोधनामुळे वैज्ञानिकांसोबतच सामान्यांची चिंता वाढली आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये जवळपास २०० वैज्ञानिकांनी जागतिक आरोग्य संघटनेला म्हटले होते की, कोरोना व्हायरस हवेतून पसरतो याबाबतचे ठोस पुरावे आहेत. कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठाचे जोस-लुइस जिमेनेज यांनी म्हटले आहे की, हवेतून कोरोनाचे संक्रमण होणारे पुरावे अधिक आहेत. जागतिक आरोग्य संस्था आणि सार्वजनिक आरोग्य संस्थांनी कोरोना विरुध्दच्या लढाईत वैज्ञानिकांच्या अभ्यासातून मिळालेल्या पुराव्यानुसार कोरोनाच्या निर्मुलनासाठी लक्ष केंद्रीत करावे.
ब्रिटेन, अमेरिका, यूएस आणि कॅनाडाच्या संशोधकांनी मिळून एक अहवाल तयार केला आहे. तसेच याची समीक्षा करताना पुराव्याच्या स्वरुपात अनेक कारणे देखील सांगितली आहेत. विषाणूच्या सुपरस्प्रेडिंग SARS-CoV-2 विषाणूला वेगाने पुढे घेवून जातो. हा विषाणू महामारीच्या सुरूवातीचा वाहक असू शकतो. अशा प्रकारच्या संक्रमणामध्ये तोंडातील किंवा नाकातून बाहेर पडणाऱ्या थेंबांपेक्षा हवेतून प्रसार होणे अधिक सोपे असते.
रुग्णांना क्वारंटाईन केलेल्या हॉटेलमध्ये किंवा एका दुसऱ्याशी सलग असलेल्या खोल्यांमध्ये राहत असलेल्या लोकांमध्येदेखील असे संक्रमण आढळून आले आहे. दोन्ही खोलीतले लोक एकमेकांच्या संपर्कात नव्हते तरीही ते बाधित झाले आहेत. नव्या संशोधनानुसार, खुल्या वातावरणाबरोबरच खोलित किंवा बंदीस्त जागेत विषाणूमुळे संक्रमणाचा धोका अधिक असतो.