सोलापूर, दि. 21:- सोलापूर शहरातील उत्तर तहसील कार्यालयात 19 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी झालेल्या गोंधळप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी चंद्रकांत काशीनाथ हेडगिरे (निवासी नायब तहसीलदार, उत्तर सोलापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी अजित कुलकर्णी व त्याचे 7 ते 8 साथीदार यांनी तहसीलदार निलेश पाटील यांच्या नावाच्या पाटीवर, अभ्यागतांच्या भेटीच्या वेळेच्या बोर्डावर तसेच कार्यालयाच्या दरवाज्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून विद्रुपीकरण केले. यावेळी “तहसीलदार चोर आहे” अशा घोषणा देण्यात आल्या.
या कृत्यामुळे शासकीय मालमत्तेचे अंदाजे ₹5000/- चे नुकसान झाले असून, घटनेचे चित्रिकरण सीसीटीव्हीमध्ये झालेले आहे.
सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या FIR मध्ये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 189(2), 356(2), 324(3) तसेच महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम 1995 व सार्वजनिक मालमत्ता एस्तऐवज अधिनियम 1984 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तपासाची जबाबदारी उपनिरीक्षक प्रवीण आनंतराव पराडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
कोट:-
“श्री कुलकर्णी यांनी केलेल्या तक्रारीमध्ये कोणतेही तथ्य नाही. उलट त्यांनीच नागपूरला जाण्यासाठी 7 ते 8 गाड्यांची मागणी माझ्याकडे केलेली होती. मी त्यांना गाड्या देऊ शकत नाही, असे सांगितले होते. मी निवडणूक कामकाजासाठी मोहोळ मध्ये असताना त्यांनी उत्तर तहसील कार्यालयात येऊन हे कृत्य केलेले आहे… त्यामुळे त्यांच्यावर सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
— श्री निलेश पाटील, तहसीलदार उत्तर सोलापूर तहसील कार्यालय, जिल्हा सोलापूर
