महाराष्ट्र

एका पत्रावर इतकी मोठी कारवाई होऊ शकते का?; हसन मुश्रीफ

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने छापे टाकले आहेत. अनिल देशमुख यांच्या मालकीच्या मुंबईसह १० ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. या छापेमारीच्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी भाजपवर टीका केली आहे. एका पत्रावर इतकी मोठी कारवाई होऊ शकते काय? असा सवाल त्यांनी यावेळी केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले, की ईडी, सीबीयआयचा राजकीय हेतूने वापर करण्यात येत आहे. एका पत्रावर इतकी मोठी कारवाई होऊ शकते का?
मुंबईतील सुखदा, ज्ञानेश्वरी बंगला, वरळीतील निवासस्थानी सीबीआय पथकाकडून सकाळी ७ वाजल्यापासून छापेमारीची कारवाई सुरु आहे. मुंबईसह १० ठिकाणी सीबीआयकडून छापेमारी सुरू आहे. मुंबईतील बार, क्लब, पबमालकांकडून दरमहा १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) याआधी माजी अनिल देशमुख यांची ११ तास कसून चौकशी केली आहे.
परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने ६ एप्रिलपासून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सीबीआयने याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्यासह परमबीर सिंह, पोलीस उपायुक्‍त डॉ. राजू भुजबळ, सहायक पोलीस आयुक्‍त संजय पाटील, सचिन वाझे, त्याच्या गाडीचे दोन चालक आणि बारमालक महेश शेट्टी यांच्यापाठोपाठ देशमुख यांचे स्वीय सहायक कुंदन शिंदे व संजीव पलांडे यांचे जबाब नोंदविले आहेत.

Related posts