साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.
महाराष्ट्र शासनाचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला असून, या अर्थसंकल्पाबाबत अनेक सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेतेमंडळींनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कळंब-धाराशिवचे विद्यमान शिवसेना आमदार मा. कैलास पाटील यांनी जिल्ह्यासाठी आश्वासक अर्थसंकल्प आशा शब्दांत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
जिल्ह्यासाठी महत्वपुर्ण असलेल्या कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी अर्थसंकल्पामध्ये 667 कोटीची तरतुद करण्यात आली आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही चांगली तरतुद झाल्याने निश्चितपणे या प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल असा विश्वास वाटतो. वैद्यकीय महाविद्यालयाच्याबाबतीत सुध्दा सरकारने अर्थसंकल्पामध्ये उल्लेख केल्याने त्यावरही मोहोर उमटली आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या व महिलाच्या हितासाठी हे सरकार अधिक सक्षमपणे पाठीशी उभे असल्याचे अर्थसंकल्पातुन दिसत आहे.
सर्वच घटकांना समान न्याय देण्याचा सरकारने कठिण काळातही प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी तीन लाखापर्यंतच्या कर्जाला आता शुन्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न यामध्ये करण्यात आले आहेत. त्यासाठी गोदामाची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विकेल ते पिकेल या योजनेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना स्वयंपुर्ण बनविण्याचा सरकारचा प्रयत्न निश्चित कौतुकास्पद आहे.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मजबूत करणारी योजना निश्चितपणे शेतकऱ्यांना उपयोगी ठरेल. सौर कृषी पंपाच्या माध्यमातून शेतीला दिवसा पाणी देण्यासाठी अखंडित वीज पुरवठा देण्यासाठीसुध्दा सरकारने पुढाकार घेतला आहे.
अशा प्रकारे सरकार च्या या अर्थसंकल्पाचे कौतुक करत आ. कैलास पाटील यांनी मा. मुख्यमंत्री यांच्यासह सर्व मंत्रीमंडळाचे आभार मानले.