साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.
तुळजापूर – तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (खु.) गावातील सहशिक्षक श्री. विठ्ठल नरवडे यांनी पहिली वर्गासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग केला आहे. श्री विठ्ठल नरवडे हे आपल्या उपक्रमशील कार्यातून सतत चर्चेत असतातच, अशातच त्यांनी इयत्ता पहिली वर्गासाठी “ऑनलाईन – ऑफलाईन – गृहभेटी” या शैक्षणिक त्रिसूत्रीचा अवलंब सुरू केलेला आहे.
पहिली वर्गातील मुलांच्या शिकण्यात ऑनलाईन पद्धतीला मर्यादा येतात हे जाणून पिंपळा खुर्द जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री. विठ्ठल नरवडे यांनी गृहभेटी घेऊन पहिली वर्गातील मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना धडे देण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाइन शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष संवाद साधून शिकवणे हाच लहान मुलांसाठी एक प्रभावी आणि परिणामकारक मार्ग आहे. सध्या करोनाच्या जागतिक संकटामुळे शाळा बंद आहेत. पहिली ते चौथीचे वर्ग केव्हा सुरू होतील हे सांगता येणे ही कठीण आहे. प्रत्यक्ष भेटीमध्ये ही कोरोनाच्या नियमांचे पालन करून या गृहभेटी घेतल्या जात आहेत.
शालेय शिक्षणात काही गोष्टी, शैक्षणिक संकल्पना प्रत्यक्षपणे भेटून आणि शिक्षकांच्या देखरेखीखालीच कराव्या लागतात. इयत्ता पहिलीच्या मुलांसाठी शिक्षक श्री. विठ्ठल नरवडे यांनी शिक्षण प्रक्रियेत ऑनलाईन शिक्षणाचा मार्गही अवलंबला. त्यानंतर मुलांची पडताळणी केली .मात्र ज्या बाबी ,कल्पना मुलांना अवगत होण्यास अडचण येते .त्यासाठी प्रत्यक्ष भेटीतून संवाद व साहित्याच्या माध्यमातून, अध्ययन अनुभवाद्वारे धडे दिले. याद्वारे मुलांच्या शिकण्यात सहजता येते म्हणून त्यांनी हा पर्याय वापरला आहे.
प्रत्येक विद्यार्थ्यांची वैयक्तिक भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जाते. यामध्ये स्वाध्याय पुस्तिकेतील अभ्यासाची पडताळणी करून त्यांना पूरक अभ्यास ही दिला जातो. तसेच स्वयंअध्ययन हा शिक्षणातील प्रभावी पर्याय आहे .याचा पाया बालवयातच घातला जावा तसेच त्यांना प्रारंभीचे धडे म्हणून स्वतः जेवण घेऊन जेवणे, आंघोळ करणे ,कपडे घालणे,घरचा अभ्यास करणे आदी गोष्टी मुलांना करण्यास भेटीतून सांगितले जाते.
शिवाय मुले पूर्णवेळ घरीच असल्याने घरातील कित्येक गोष्टींचा, कृतींचा मुलांच्या शिक्षणासाठी कसा उपयोग करता येईल हेही पालकांना भेटून समजावून सांगितले जाते. केवळ पाठ्यपुस्तका वरच अवलंबून न राहता “करून पाहूया” , “शोधून काढूया” यासारखे उपक्रम घेऊन शिकण्यातील आनंद निर्माण करण्यासाठी ही ते प्रयत्नशील आहेत. अशाने आनंदाचं शिक्षण नि शिकण्याची सहजता साधणार आहे.विद्यार्थी आपला वेळ ही शिकण्यात घालवू शकणार आहेत.
====================
कोरोना परिस्थितीत मुलांचे शिक्षण सुरू आहे. इंटरनेट, टीव्ही ,ऑनलाइन शिक्षण याद्वारे प्रयत्न सर्वत्र केले जात आहेत. ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणास काही अंशी मर्यादा येतात .त्यामुळे आम्ही ऑफलाइन शिक्षण, गृहभेटी हा सुद्धा पर्याय वापरत आहोत. सध्याच्या काळात पालकांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याने त्यांचेही सहकार्य घेऊन प्रयत्न सुरु आहेत.
शिक्षक – श्री.विठ्ठल नरवडे
================