अशोक सोनकंटले
विशेष प्रतिनिधी दक्षिण सोलापूर
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महामार्गाच्या व्हिजनमधून सोलापूर जिल्ह्याला झुकते माप मिळाले आहे. जिल्ह्यातील एकूण सहा महामार्गाच्या कामाला मंजुरी मिळाली असून यात आ. सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे मोहोळ ते तांदुळवाडी या महामार्गाला पहिल्या टप्प्यात ५४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. निधी दिल्याबद्दल आ. देशमुख यांनी ना. गडकरी यांचे आभार मानले आहेत.
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी रविवारी राज्यातील ८२९ कि.मी.च्या तब्बल ५४प्रकल्पांना मंजुरी दिली. त्यासाठी तब्बल ४ हजार ५९० कोटी रूपये दिले. यात सोलापूर जिल्ह्यातील सहा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये आ. सुभाष देशमुख यांनी पाठपुरावा केलेल्या मोहोळ- कुरूल- कामती- कंदलगाव मंद्रूप- बसवनगर- तेरामैल – कणबस -आचेगाव-कणबस-धोत्री- तांदुळवाडी या महामार्गाचाही समावेश आहे. या महामार्गासाठी आ. देशमुख हे गडकरी यांच्याकडे २०१५ पासून पाठपुरावा करत होते. अखेर आज त्याला पहिल्या टप्प्यात ५४ कोटी ७ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या मंजूर झालेल्या प्रकल्पामुळे दळणवळणाच्या सुविधा वाढणार आहेत. हा प्रकल्प मंजूर करून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. देशमुख यांनी ना. गडकरी यांचे आभार मानले आहेत.
सर्व गावांचा चेहरा बदलणार. – आ. सुभाष देशमुख.
नितीन गडकरी यांच्या कामाचे संपूर्ण देशातून कौतूक होत आहे. त्यांच्याकाळात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार कामे होत आहेत. मोहोळ ते तांदुळवाडी महामार्गाला ५४ कोटींचा निधी त्यांनी मंजूर केला आहे. या रस्त्यांमुळे या सर्व गावांचा चेहरा बदलणार आहे, असे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले.