महाराष्ट्र

अधीर रंजन चौधरींसह ३३ खासदार निलंबित

नव्या संसद भवनातील सुरक्षाभंगाच्या गंभीर घटनेचे तीव्र पडसाद सोमवारी ( १८ डिसेंबर ) लोकसभेत उमटले. सुरक्षेतील त्रुटसंदर्भात सविस्तर स्पष्टीकरण देण्याची मागणी करत विरोधी पक्षानं गोंधळ घातला. त्यापार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेस खासदार, विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह ३३ खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले.

संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी, द्रमूकचे खासदार टी. आर. बालू आणि दयानिधी मारन, तृणमूल काँग्रेसच्या सौगता रॉय यांच्यासह अन्य खासदारांचा समावेश आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ३० खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित हंगामासाठी निलंबित केलं आहे. तर, विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत तीन खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे.

यापूर्वी लोकसभेच्या १३ आणि राज्यसभेच्या एका खासदाराचं निलंबन करण्यात आलं होतं. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची एकूण संख्या ४७ वर पोहोचली आहे.

Related posts