उस्मानाबाद प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
उस्मानाबाद :- काल दि. 29 डिसेंबर रोजी रात्री 12.30 वा. राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरुन येरमाळा- उस्मानाबाद अशा जाणाऱ्या कार समोर दरोडे खोरांनी वाहन जॅक टाकल्याने ती कार त्यास धडकून थांबली असता बाजूस अंधारात लपलेल्या 6 बुरखाधारी तरुणांनी त्या कारमधील प्रवाशांना मारहाण करुन, धाक दाखवून एकुण 190 ग्रॅम सोन्याचे दागिने, 3 मनगटी घड्याळे, 4 भ्रमणध्वनी व 61,000 ₹ रोख रक्कम असा ऐवज लुटून नेला होता. यावरुन येरमाळा पो.ठा. गु.र.क्र. 164 / 2020 भा.दं.सं. कलम- 395, 341 अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखा तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक – श्री. गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील स पो नि- श्री निलंगेकर, पोउपनि- श्री पांडुरंग माने, सदानंद भुजबळ, पो हे कॉ- काझी, ठाकुर, कवडे, पोना- शेळके, हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, कावरे, पोकॉ- अविनाश मारलापल्ले, आरसेवाड, होळकर यांसह येरमाळा पो.ठा. चे सपोनि- श्री पंडीत सोनवणे व येरमाळा पो.ठा. च्या अंमलदार यांच्या संयुक्त पथकाने गतीमान तपास चक्रे फिरवली. लुटमार प्रकरणाचा पोलीसांनी अवघ्या 24 तासांच्या आत छडा लावून मोहा ता. कळंब येथून 1)महेश शिवाजी पवार उर्फ चेल्या, वय 20 रा. बोरखेड, ता. बीड 2)बबन शहाजी काळे उर्फ लल्ल्या, वय 22 वर्षे, 3)प्रकाश शहाजी काळे, वय 19 वर्षे, दोघे रा. मोहा, ता. कळंब यांना ताब्यात घेउन दरोड्यात लुटलेल्या नमूद माला पैकी 4 भ्रमणध्वनी जप्त केले आहेत. गुन्ह्यातील त्यांचे अन्य साथीदार व लुटीतील उर्वरीत माल याविषयी येरमाळा पो.ठा. मार्फत पुढील तपास केला जात आहे.