साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.
धाराशिव (उस्मानाबाद) – जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद (धाराशिव) येथे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने तसेच ऑक्सिजन पुरवठा कमी प्रमाणात होत आहे तो वाढवावा व सरकारी रुग्णालयातील ऑक्सिजन प्लॅन्ट तात्काळ चालू करण्याबाबत धाराशिव(उस्मानाबाद) लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आढावा बैठक घेतली.
या बैठकीत खा. ओमराजे निंबाळकर साहेबांनी रेमडीसिव्हीर इंजेक्शनच्या सुरळीत पुरवठ्याबाबत माहिती घेतली व रेमडीसिव्हीर इंजेक्शन चा काळाबाजार होत असल्याने यापुढे हे इंजेक्शन जिल्हाधिकारी कोरोना वॉर रूम कार्यालयामधून संबंधित रुग्णाच्या नावाने रुग्णालयास दिले जाईल व त्याच रुग्णास ते इंजेक्शन वापरणे त्या रुग्णालयास बंधनकारक असेल. यामुळे आवश्यक अशाच रुग्णांना इंजेक्शन चा वापर होईल व सूरु असलेला काळाबाजार थांबेल. तसेच अत्यंत उपयुक्त अशा कोरोना लसीचा पुरवठा सुरळीत होत आहे का? याची माहिती घेतली व लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होणे साठी पाठपुरावा करू तसेच जोपर्यंत टेस्टिंग ची स्पीड वाढवली जाणार नाही तोपर्यंत रुग्णसंख्येवर आळा घालता येणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त टेस्टिंग करण्यावर भर देण्यास सुचवले. रुग्णांना बेड उपलब्धतेबाबत अडचण येऊ नयेत म्हणून पुरेसे बेड उपलब्ध आहेत का? याची माहिती घेतली व कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासंदर्भात तात्काळ उपाययोजना करण्यास खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सूचना केल्या.
तसेच सर्व नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. मास्क वापरा, सोशल डिस्टनसिंग चे सर्व नियम पाळा, हात स्वच्छ धुवा असे आवाहन खा. ओमराजे निंबाळकर यांनी नागरिकांना केले. आई तुळजाभवानी चरणी माझी प्रार्थना आहे हे कोरोनरुपी संकट लवकरच दूर करून सर्व काही पूर्वीसारखे सुजलाम – सुफलाम होवो अशी प्रार्थना त्यांनी यावेळी आई तुळजाभवानी च्या चरणी केली.
या बैठकीस कळंब – उस्मानाबाद चे आमदार कैलास घाडगे पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर, डॉ.जयप्रकाश राजेनिंबाळकर, निवासी जिल्हाधिकारी श्री.स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, अन्न व औषध प्रशासन उप आयुक्त श्री.दुसाने आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.