भारत

एकाच शाळेतील 28 विद्यार्थीनींना कोरोनाची लागण,

दोन वर्षांपासून कोरोना महामारीनं जगभरात थैमान घातलं. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. कोरोनाची रुग्णसंख्या घसरल्यामुळे शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. पण अशातच तेलंगणातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. रविवारी तेलंगणामधील खम्मम जिल्ह्यातील रेसिडेंशियल शाळेतील 28 विद्यार्थीनींना कोरोनाची लागण झाली आहे. एकाचवेळी इतक्या मुलींना कोरोनाची लागण झाल्यामुळे समुह संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. पालकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालेय.

कोरोनाच्या प्रादुर्भाव झाल्याची माहिती मिळताच पालकांनी शाळेत धाव घेतली अन् पाल्यांना घरी पाठवण्याची विनंती केली. येथील आरोग्य विभागाने शिक्षकांसह सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. रेसिडेंशियल शाळेत 575 विद्यार्थी आहेत. तेलंगणा आरोग्य मंत्री टी. हरीश राव यांनी फोन करत याबाबतची अधिक माहिती घेतली असून, काही सूचनाही केल्या आहेत. तेलंगणा आरोग्य मंत्री टी. हरीश राव यांनी अधिकार्यांना आणखी चांगली आरोग्य व्यवस्था प्रदान करण्याचं आवाहन केलं आहे. शिवाय, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचा सल्ला दिलाय.

एक सप्टेंबरपासून तेलंगणामधील शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. पण येथील कोरोनाची स्थिती अद्याप सुधारलेली दिसत नाही. तेलंगणा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी तेलंगणात 103 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. लोकांमध्ये तिसऱ्या लाटेची भीती अद्याप कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणं उघडली जात आहेत. मात्र, लोकांकडून कोरोना नियमांचं पालन झालेलं दिसत नाही.

देशातील कोरोना स्थिती – 
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 8 हजार 488 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर देशात 24 तासांत 249 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, देशात 538 दिवसांनी सर्वात कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख 18 हजार 443 आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल (रविवारी) 24 तासांत कोरोनाच्या 12 हजार 510 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या महामारीमध्ये जीव गमावलेल्यांचा आतापर्यंतचा एकूण आकडा 4 लाख 65 हजार 911 वर पोहोचला आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 3 कोटी 39 लाख 34 हजार 547 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Related posts