भारत

सोनिया गांधींचे पाच राज्यांच्या अध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश!

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेल्या सपशेल अपयशानंतर आणि पंजाबमधील सत्ता गमावल्यानंतर आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काही कडक पावलं उचलण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. कारण, आता सोनिया गांधी यांनी विधानसभा निवडणूक झालेल्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या पीसीसी अध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगितलं आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या पीसीसी अध्यक्षांना पीसीसीची पुनर्रचना सुलभ करण्यासाठी त्यांचे राजीनामे देण्यास सांगितले आहे,” अशी माहिती काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे.पाचही राज्यांच्या विधासभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागला होता, त्यानंतर आज म्हणजेच अवघ्या पाच दिवसांमध्ये सोनिया गांधींनी या पाच राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे मागितले आहेत.पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारी समितीची आत्मपरिक्षण बैठक रविवारी झाली. या बैठकीत पक्षनेत्यांनी राहुल गांधी यांनी पुन्हा पक्षाध्यक्षपद स्वीकारावे, असे म्हटले आले. मात्र, सध्या तरी सोनिया गांधी यांच्याकडेच अध्यक्षपद राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी काँग्रेसच्या पराभवानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे गांधी कुटुंबाच्या मदतीला धावून आले आहेत. या पराभवासाठी त्या एकट्या नाहीत तर राज्यातील प्रत्येक नेता आणि खासदार जबाबदार आहेत, असे खरगे यांनी म्हटले आहे.

Related posts