नवी दिल्ली: सध्या देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत. ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट वादात सापडलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: चित्रपटाचे स्टार प्रचारक आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून ३२ वर्षांपूर्वीचा काश्मिरी पंडितांचा आक्रोश मोठ्या पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे.
मात्र, या चित्रपटात अनेक सत्य गोष्टी दडपण्यात आल्या आहेत. यापूर्वी ‘काश्मीर फाईल्स’च्या निर्मात्यांकडून ‘ताश्कंद फाईल्स’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, यामध्ये लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचं खापर एकाच कुटुंबावर फोडण्यात आले होते. हा राजकीय अजेंडा राबवण्याचा प्रकार आहे, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली.काश्मिरी पंडितांच्या समस्या आणि व्यथा शिवसेनेइतक्या कोणालाही माहिती नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांनी त्याकाळी काश्मिरी पंडितांच्या प्रश्नांवरून ठाम भूमिका घेतली होती. बाकीजण त्यावेळी दहशतवाद्यांना घाबरून गप्प बसले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या आग्रहानेच काश्मिरी विस्थापितांना महाराष्ट्रात वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग शिक्षणात ५ टक्के आरक्षण देण्यात आले. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते. काश्मिरी पंडितांना संरक्षणासाठी एके ४७ द्याव्यात, अशी भूमिका बाळासाहेबांनी घेतली होती. भाजपशासित राज्यांमध्ये ‘द कश्मीर फाईल्स’ करमुक्त करण्यात आला आहे. पण चित्रपट टॅक्स फ्री करून काहीही होत नाही. काश्मिरची खरी फाईल, ही आम्हाला माहिती असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.