24.6 C
Solapur
November 10, 2024
अक्कलकोट

अक्कलकोट-सोलापूरचा रस्ता होतोय हायटेक काम आले अंतिम टप्प्यात.

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –
सोलापूर ते अक्कलकोट चौपदरी रस्त्याचे काम आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. चाळीस किलोमीटरचा हा रस्ता अतिशय चकाचक होत आहे. यामुळे भाविकांना आता दर्शनासाठी वेळेत पोचता येणार आहे. या सुपरफास्ट रस्त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. दोन ते अडीच वर्षापासून या रस्त्याचे काम सुरू आहे. हा रस्ता चौपदरी आहे. तीर्थक्षेत्रांना जोडणारा दुवा म्हणून या रस्त्याकडे पाहिले  जात आहे. अक्कलकोट सोलापूर हे ४० किलोमीटरचे अंतर असून या रस्त्यावर नऊशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पूर्वी हा रस्ता दुपदरी होता त्यामुळे अपघाताचे प्रमाण मोठे होते. ते आता चौपदरीकरणामुळे कमी झाले आहे. रस्त्याचे काम वेगाने सुरू असून कुंभारी, लिंबीचिंचोळी, कर्जाळ, वळसंग या ठिकाणी पूलाचे काम सुरू आहेत. तर विडी घरकुलशेजारी, तोगराळी, कोन्हाळी याठिकाणी उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास आले असून याठिकाणी दुभाजकासह पथदिवे बसविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

या रस्त्याचे वैशिष्ट्य म्हणजे अत्याधुनिक मशिनरीद्वारे कॉंक्रिटीकरण केले आहे.हा रस्ता पूर्ण झाल्यास रोडकडेला असलेल्या कुंभारी,तोगराळी, लिंबीचिंचोळी, वळसंग, कर्जाळ या गावांना याचा मोठा फायदा होणार आहे. या माध्यमातून रस्त्याकडेला व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार मिळणार आहे. विशेष म्हणजे अक्कलकोटपासून जवळच तुळजापूर आणि गाणगापूर हे  दोन तीर्थक्षेत्र आहेत. शेजारीच कर्नाटक राज्याची सुरूवात होते. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या दळवळणाला या रस्त्यामुळे चालना मिळणार आहे. त्यामुळे अक्कलकोटला येणाऱ्या प्रत्येक भाविकाला या रस्त्यावरून यावे लागते. म्हणूनच अक्कलकोट हे भविष्यकाळात या रस्त्यामुळे मध्यवर्ती ठिकाण बनू शकेल.आर्थिक हिताच्या दृष्टीने त्याचा फायदा हा अक्कलकोटलाच जास्त होणार आहे. हे काम केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने कामाला गती आहे.येत्या सहा महिन्यात काम पूर्णपणे 
मार्गी लागेल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे..

स्वामीभक्तांच्या वेळेतील बचत मोलाचे. – अक्कलकोट-सोलापूरच्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो स्वामीभक्त प्रवास करतात.महाराष्ट्रासह अनेक राज्यातील भाविक स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला येतात.पूर्वीपेक्षा आता भाविक कमी वेळेत अक्कलकोटला पोहोचतात.नव्या रस्त्यामूळे भाविकांच्या वेळेतील बचत मोलाची ठरत आहे.इंधनाची बचत होऊन पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल.
– अमोलराजे भोसले (प्रमुख विश्वस्त, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ)

केंद्र शासनाची वचनपूर्ती – २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अक्कलकोट-सोलापूर रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे आश्वासन दिले.यानंतर रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केल्याने रस्त्याचे चौपदरीकरण पूर्णत्वास आले आहे.यामूळे स्वामीभक्तांच्या वेळेत बचत होईल.तसेच अक्कलकोटहून गाणगापुर व तुळजापूर या तीर्थक्षेत्राचा प्रवास सोपा झाला आहे.
-सचिन कल्याणशेट्टी (आमदार,अक्कलकोट)

या रस्त्यामुळे तीस टक्के अर्थकारण वाढणार आहे.एखादा भाविक सकाळी पुण्यातुन निघुन दर्शन करुन परत जाऊ शकतो आणि भाविक आता तसे करत आहेत.गाणगापुर , तुळजापुर ही रस्ता चांगला असल्याने धार्मिक पर्यटनाला चालना मिळत आहे.
-महेश इंगळे(चेअरमन वटवृक्ष देवस्थान)

सोलापूर – अक्कलकोट काम हे व्यापक आहे. हे काम नियोजित काळात पूर्ण करण्याचा प्रयल आहे. बयाचदा रस्त्यासाठी लागलेले साहित्य लवकर उपलब्ध झाले नाही की थांबून राहते. अशावेळी त्याची वेळेत पूर्तता करण्यासाठी आमची धडपड असते. आता रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून दुभाजक, टोलनाका, उड्डाणपूलसह इतर कामे ही वेगाने सुरु आहेत.
-पवन श्रीवास्तव, प्रोजेक्ट मॅनेजर, ग्रील

Related posts