उमेश पवळ प्रतिनिधी
२८ नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे भव्य पेन्शन मेळावा १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्यातील ६० पेक्षा जास्त कर्मचारी संघटना एकत्र येऊन राज्यभर पेन्शन संघर्ष याञा काढत आहेत. ही यात्रा सोलापूर जिल्ह्यात २८ नोव्हेंबर रोजी येणार आहे (जत – सांगोला -अकलूज). त्या दिवशी अकलूज ता.माळशिरस येथे भव्य असा पेन्शन महामेळावा आयोजित करण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने कर्मचारी बांधव उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री अरुण चौगुले सर यांनी दिली.
२२ नोव्हेंबर २०२१ रोजी आझाद मैदान, मुंबई येथून पेन्शन संघर्ष यात्रा सुरू होते आहे. महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमधून ही संघर्ष यात्रा प्रवास करणार आहे. सहभागी सर्व संघटनांचे पदाधिकारी या संघर्ष यात्रेत मार्गदर्शन करणार आहेत , अशी माहिती जिल्हा नेते श्री तात्यासाहेब जाधव सर यांनी दिली.
शिक्षण, महसूल, आरोग्य, तंत्र व उच्चशिक्षण,आयटीआय, भूजल सर्वेक्षण , ग्रामसेवक, वित्त संस्था,वनविभाग , जलसंपदा, पाटबंधारे, विद्यापीठ कर्मचारी इ.सर्व विभागातील सर्व कर्मचारी या संघर्ष यात्रेत सहभागी झाले आहेत. माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे दि. २८ नोव्हेंबर रोजी संघर्ष यात्रेतील मार्गदर्शक मान्यवरांच्या उपस्थितीत पेन्शन मेळावा होणार आहे.या मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त कर्मचारी बंधू भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष श्री साईनाथ देवकर सर यांनी केले आहे.