24.2 C
Solapur
September 26, 2023
महाराष्ट्र

नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने नवाब मलिकला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ईडीने मलिक यांना २३ फेब्रुवारीला मनी लॉन्डिरग प्रकरणात अटक केली होती. यानंतर न्यायालयाने नवाब मलिक यांना ७ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली, त्यानंतर सोमवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.

दाऊद इब्राहिमशी संबधित मनी लॉन्डिरग प्रकरणात नवाब मलिक यांना दीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवले होते. ही कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने मलिक यांना ७ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती.

मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती आणि त्याच दिवशी त्यांना आठ दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले होते. सकाळी ६ वाजता केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मलिक यांच्या घरी पोहोचले, जिथे त्यांची तासभर चौकशी करण्यात आली. यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले आणि त्यांची प्रदीर्घ चौकशी झाली. चौकशीनंतर मलिक यांना अटक करण्यात आली.

Related posts