भारत

परिस्थिती सुधारली नाही तर दिल्लीत रस्त्यांवर मृतांचा खच पडेल

दिल्लीतील कोरोना संकटाची स्थिती हाताबाहेर गेली असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकार लोकांना मदत करण्यात व दिलासा देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप सत्ताधारी आम आदमी पक्षाचे आमदार शोएब इक्बाल यांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे इक्बाल यांनी केजरीवाल सरकारवर आरोप करत न थांबता, दिल्ली सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशीही मागणी केली आहे.
कोरोनाने दिल्लीची दशा बदलवून टाकली आहे. दिल्लीत कोणतेही काम होत नसून लोकांना ना ऑक्सिजन मिळत आहे, ना औषधे आणि ना बेड मिळत आहेत. दिल्लीत कागदावरच सरकार चालले आहे. मी सहावेळचा आमदार झालो असून माझेही कोणी ऐकत नाही. नोडल अधिकारी कुठेच दिसून येत नाहीत. दिल्लीची एकंदर परिस्थिती पाहिली तर राष्ट्रपती राजवट लावल्याशिवाय पर्याय नाही, असे इक्बाल यांनी म्हटले आहे. परिस्थिती सुधारली नाही तर शहरात रस्त्यांवर मृतांचा खच पडेल, असा इशारा देतानाच किमान तीन महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान काँग्रेस आणि भाजपने राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या इक्बाल यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून दिल्लीतील कोरोनाचे संकट वाढण्यास सुरुवात झाली होती. गेल्या काही दिवसांपासून दैनिक रूग्ण संख्येत २० हजारांपेक्षा जास्तने वाढ होत आहे. गुरुवारी दिल्लीत २४ हजार २३५ नव्या रुग्णांची नोंद झाली तर मृतांचा दैनिक आकडा ३९५ वर पोहोचला आहे. दिल्लीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ११ लाख २२ हजार २८६ वर गेली आहे. तर संक्रमणचा दर हा ३२.८२ टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोनाने गेल्या वर्षभरात १५ हजार ७७२ लोकांचा बळी घेतला आहे. दिल्लीतील सक्रिय रुग्णांचा आकडा आता एक लाखांच्या समीप पोहोचला आहे.

Related posts