सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार व सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी आज मुंबई येथे भाजपात प्रवेश केला.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलीप माने यांचे भाजपात स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते. याचवेळी माजी नगरसेवक जयकुमार माने व नागेश ताकमोगे, पृथ्वीराज माने यांचाही भाजपात प्रवेश झाला.आज मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात दिलीप माने हे आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या पक्षप्रवेशाबाबत जोरदार चर्चा सुरू होती, मात्र अंतर्गत विरोधामुळे हा प्रवेश रखडलेला होता.
विशेष म्हणजे, भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनी दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला जोरदार विरोध केला होता. त्यामुळे हा पक्षप्रवेश होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
मात्र आता आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने राजकीय गणिते जुळवत दिलीप माने यांचा पक्षप्रवेश निश्चित केल्याचे चित्र आहे.
दोन दिवसांपूर्वी दिलीप माने यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच त्यांच्या भाजप प्रवेशावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.
दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशामुळे सोलापूरच्या स्थानिक राजकारणात मोठे समीकरण बदलण्याची शक्यता असून, महापालिका निवडणुकीआधी हा प्रवेश भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
next post
