सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वपक्षीय नेते कामाला लागले सोलापूरातील कम्युनिष्ट नेत आणि माजी आमदार नरसय्या आडम (Narsayya Adam) यांनी महाविकास आघाडीतून यंदा विधानसभेची जागा मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंना इंडिया आघाडी म्हणून पाठिंबा दिला होता. त्यावेळीच, विधानसभेला ही जागा माकपला देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, आता विधानसभेसाठी नरसय्या आडम यांची तयारी सुरू असून अल्पसंख्यांक मेळाव्यातून त्यांनी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि रामगिरी महाराजांवर (Ramgiri Maharaj) जोरदार हल्लाबोल केलाय. तसेच, यंदा निवडणुकीत निवडून आल्यावर रामगिरीला बेड्या घातल्या नाही तर मला आडम मास्तर म्हणू नका, अशा शब्दात त्यांनी इशारा दिला आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्यावतीने सोलापूर शहर-मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये अल्पसंख्यांक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना माजी आमदार नरसय्या आडम यांनी नेहमीच्यास्टाईलने आक्रमक भाषण केलं. तसेच, हिंदू आणि मुस्लीम यांच्यात द्वेष व तेढ निर्माण करत असल्याचा आरोप भाजपवर केला आहे. मेळाव्यात बोलताना नरसय्या आडम यांनी नितेश राणे आणि रामगिरी महाराजांवर सडकून टीका केली. यंदाच्या वर्षी मी निवडून आल्यावर रामगिरीला बेड्या घातल्या नाही तर मला आडम मास्तर म्हणू नका. नारायण राणेच्या पोट्याला देखील आमदार झाल्यानंतर बघायचं आहे. आमदार झाल्यावर त्याला (नितेश राणेला) माफी मागायला लावणार, अशा शब्दात नरसय्या आडम यांनी आक्रमक शैलीत भूमिका मांडली.