सगळ्यांना अस्वस्थ वाटेल अशी रंजीत बोबडे बाबत वस्तुस्थिती कोरोना काळ सुरू झाल्यापासून सातत्याने लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारा, हजारो गरजू लोकांना रोज भोजन, फॅमिली किट, मास्क वाटप करून त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करणारा, ग्रामीण भागातील अनेक PHC ला PPE किट वाटप करणारा व गेल्या तीस वर्षापासून विदर्भाच्या सामाजिक जीवनामध्ये कार्यरत असणारा आमचा मित्र रंजीत बोबडे, विकासगंगा संस्थेचा कार्यकारी संचालक मागच्या आठ दहा दिवसांपासून आजारी होता. घाटंजीचे डॉ भुरे व नंतर डॉ ढाले यांनीही त्यांचेवर तात्काळ उपचार केले तरीही शरीराचे तापमान वाढतच होते. शेवटी यवतमाळ गाठले. त्यांची आई वय 88 वर्ष त्या पण आजारी होत्या. त्यांची डॉ शहा कडे कोरोना चाचणी केली व औषधी देऊन त्यांना घरी पाठवले, 2 दिवसांनी त्यांचा अहवाल नकारात्मक आला. सध्याच्या वातावरणामुळे शेवटी रंजीत ची कोरोना टेस्ट केली, सिटी स्कॅन केला त्यात निमोनिया निघाला तरीही कोणत्याच खाजगी हॉस्पिटल मध्ये घेतले नाही. शेवटी सरकारी हॉस्पिटल GMC यवतमाळ ला 6 सप्टेंबर ला विवेक गावंडे TV9 यांची घेऊन रात्री 10 वाजता दाखल केले. तिथे काहीच उपचार केला नाही, ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने 7 तारखेला ऑक्सिजन दिल्या गेले व ताप कमी व्हायच्या गोळ्या दिल्या. नंतर तीसऱ्या दिवसी 8 तारखेला कोविड रिपोर्ट नकारात्मक आल्याने कोविड संशयितांच्या वार्डातुन TB वार्ड मध्ये पाठवले, त्या ठिकाणी बेड उपलब्ध नव्हते, रिसीप्शन हॉल मध्येच त्यांनी खाली एक गादि टाकली व झोपले, या ठिकाणी त्यांचेवर कोणताच उपचार केला नाही. 2-3 तासांनी एक डॉक्टर आले व त्यांनी सांगितले की तुमचे सर्व रिपोर्ट तर नॉर्मल आहे, तुम्हाला काही त्रास आहे असे वाटत नाही, तुम्हाला सकाळी सुट्टी देतो, तुम्ही घरी जा मस्त आराम करा व भरपूर जेवण घ्या अशा सूचना दिल्या, कोरोना नकारात्मक आल्याने न्युमोनियावर कुठे बाहेर उपचार करू असे वाटून सरकारी दवाखान्यातून सुट्टी घेतली.
मात्र 8 सप्टेंबर ला रात्री ऑक्सीजन कमी होत असल्या बाबत मुलाचा म्हणजेच रिटेश बोबडे चा फोन आला.
अशा रुग्णाला डॉ. भाषेत कोरोना संशयीत समजले जाते. दवाखान्यात भरती केले पाहिजे अशी आम्हा मित्रांची चर्चा झाली आणि मग सुरू झाला दवाखान्याचा शोध…..
यवतमाळात कुणीही हा रुग्ण घेण्यास तयार नव्हते. असा रुग्ण कधीही पोसिटिव निघू शकतो असे सगळ्या डॉ. चे सांगणे. डॉ. शहा नी 8 तारखेला रुग्ण घेणे बंद केले होते. ते यवतमाळात असलेले एकमेव कोविड केंद्र त्यामुळे अमरावती, नागपूर सगळीकडे फोना फोनी करणे सुरू केले. सुरेश भाऊ राठी, डॉ. किशोर मोघे GSMT, डॉ. शुभांशु दरणे, त्यांचा मुलगा स्वतः सुध्दा प्रयत्न करीत होताच. मी अमरावतीतील सगळ्या कोविड सेंटर वर फोन केले. दोन ठिकाणी फोनच उचलले गेले नाहीत. बाकी लोकांकडे मोठी प्रतीक्षा यादी होती. कुणी दुसऱ्या दिवशी सांगतो बोलत होते. प्रत्येकाला फोन करताना कुणाची तरी ओळख सांगत होतो. तेथील माझ्या व सुरेश भाऊंच्या परिचित मंडळींनी ही खूप प्रयत्न केले. पण रात्री ११ पर्यंत प्रयत्न करूनही कुठेच काही जमले नाही. 9 तारखेला सकाळी नऊ पासून पुन्हा नागपूर, अमरावती फोन सुरू केले. काहींनी तसे सांगितले होतेच. बाराचे दरम्यान नागपूरचे दोन हॉस्पिटल मधून रुग्णास पाठवा असा निरोप आला. हाताशी असो म्हणून आम्ही दोघांशीही बोलत होतो. दोघांनाहि रुग्णाचा इतिहास सांगितला. त्यांनी होकार भरला. आणि रुग्ण त्याच्या घाटंजी वरून अंबुलस ने नागपूर कडे साडे बाराला निघाला. पहिल्या हॉस्पिटल मध्ये पाचचे सुमारास पोहोचला. त्यांनी कागदपत्रे पाहिली एक तास बसून ठेवले आणि आम्ही इलाज नाही करू शकत म्हणून दुसरीकडे जायला सांगितले. मग हाताशी असलेले दुसरे हॉस्पिटल ज्यात यवतमाळचे माझे एक परिचित ट्रस्टी आहेत त्यांनी ही होकार भरलेला होताच तिथे नेले.
त्यांनीही सगळे बघितल्या सारखे करून रुग्णाला नाकारले. तिथल्या देवेंद्र गणवीर या रुग्ण सेवकाला घेऊन रितेश व भाचा संदीप मोहाडे यांनी ७, ८ हॉस्पिटल पालथे घातले. कुठेही प्रवेश मिळू शकला नाही. अखेर यवतमाळला येण्यास निघाले असताना मी व विवेक गावंडे (TV9 चे प्रतिनिधी) सावंगी दवाखान्यात विचारणा केली आणि रात्री साडे दहा चे दरम्यान रुग्ण तिथे भरती होऊ शकला. यात किती मोठ्या मानसिक यातना त्या रुग्णाला, त्याच्या आप्तांना, आम्हा मित्रांना भोगाव्या लागल्या ह्याची मोजदाद होऊ शकत नाही.
कोरोनाने मला माझी जागा दाखवली. असेही मला वाटले. मला खूप वाटायचे आपल्या खूप ओळखी आहेत वगैरे. त्या आहेतच पण त्या कोरोना काळात उपयुक्त ठरतीलच ह्याची अजिबात खात्री नाही.( यवतमाळ च्या बहुतांश डॉ. मंडळींशी माझे खूप छान संबंध आहेत. अनेक गरजू रुग्णांसाठी वेळोवेळी मी त्यांची मदत घेत असतो. तेही शक्य ती सगळी मदत करीतच असतात.
कोरोना काळामध्ये मात्र सगळेच अगतिक आहेत हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावे.) काल रात्री १० ला रुग्ण सावंगीला भरती व्हायच्या आधी मी व सुरेश भाऊ डॉ. शहा कडे ही जाऊन आलो. ते तर बिझीच आहेत. ते कामात होते म्हणून फोन ला उत्तर आले नाही. मग साडे दहा चे सुमारास त्यांचा सुरेश भाऊला फोन आला की पाठवू शकता पेशंट म्हणून. तो पर्यंत रुग्ण सावंगीत पोहोचला होता.
हे विस्ताराने या साठी लिहिले की उत्तम सामाजिक संपर्क असणाऱ्या लोकांचे हे हाल आहेत तर सर्व सामान्य लोकांचे काय होत असेल…. एवढ्यात डॉ.च्या उपचाराशिवाय इतर आजारांनी मरण पावलेल्या रुग्णांची संख्या वाढती आहे. आणि कोरोणाची लागण वाढती आहे. अशा स्थितीत मला एवढेच वाटते की शक्यतो शासकीय दवाखान्याचा घट्ट आधार सोडू नये. तेथील खाटांची संख्या सरकारने त्वरित वाढवावी. खाजगी कोविड केंद्र कसे अधिक होतील आणि त्यांच्यावर योग्य ती शासकीय देखरेख कशी राहील हेही बघावे. मी वर्णन केलेला प्रसंग कुणाच्याही वाट्याला येऊ नये असे वाटते. मला कुणावरही आरोप करायचे नाहीत.
आपण सगळ्यांनीच आरोपींच्या पिंजऱ्यात उभे राहण्याची गरज आहे. आपल्या सगळ्याच व्यवस्थेचे मूल्यांकन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा आपल्यातील मनुष्यत्व उणे होईल.
प्रा.घनश्याम दरने, सावित्रीबाई ज्योतिराव समाजकार्य महाविद्याल यवतमाळ.