महाराष्ट्र

प्रबोधनकारांना मध्ये आणू नका, तुम्हालाही परवडणार नाही

महाराष्ट्रात जातीय राजकारणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे आमने-सामने आल्याचं चित्र आहे. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रबोधनकार ठाकरेंचं लिखाण वाचण्याचा सल्ला दिला. त्यावरून राज ठाकरे यांनी पवारांना उलट सवाल केला आहे. मी जे बोललो त्याचा प्रबोधनकारांच्या लिखाणाशी काय संबंध, हे मला पवारांनी समजून सांगावं, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

राज ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर असून, दुपारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे म्हणाले,’मी प्रबोधनकार ठाकरे वाचले आणि यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत. मी जे बोललो, त्याचा प्रबोधनकारांच्या लिखाणाशी काय संबंध हे मला शरद पवारांनी समजून सांगावं. स्वातंत्र्याची ७५ वर्ष या संदर्भाने ती मुलाखत होती. त्यात अनेक लोक होती’, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
<iframe width=”560″ height=”315″ src=”https://www.youtube.com/embed/jsFlsreSXss” title=”YouTube video player” frameborder=”0″ allow=”accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture” allowfullscreen></iframe>

‘आपल्याकडे मॉल्स आले, हातात मोबाईल आले, चांगल्या काही गोष्टी आल्या. पण वैचारिक दृष्ट्या सुधारलो का? असा प्रश्न होता. त्या अंगानेच मी बोललो. अजूनही आपण जातीपातीत अडकलेलो आहोत. अजूनही निवडणुकीत रस्ते, पाणी देऊ हेच सांगितलं जातं. मग आपण ७४ वर्षात काय मिळवलं, हे शोधणं आवश्यक आहे, असं मला वाटतं,’ असं राज ठाकरे म्हणाले.

‘१९९९ हे साल जर बघितलं, तर ९९च्या अगोदर महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. ९९ नंतर जातीपातीमध्ये एकमेकांबद्दलचा द्वेष वाढला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातींजातीमध्ये जास्त द्वेष निर्माण झाला. त्या अगोदर प्रत्येकाला जातीबद्दल अभिमान होता, पण दुसऱ्या जातींबद्दल द्वेष नव्हता. तो राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाला. यात पुन्हा प्रबोधकार ठाकरे वाचण्याचा काय संबंध? मला अर्थच कळला नाही’, असं म्हणत राज ठाकरे यांनी निशाणा साधला.

‘माझ्या आजोबाचे अनेक संदर्भ हे त्या-त्या काळातील होते. मला वाटतं, आपल्या हवे तितके प्रबोधनकार ठाकरे घ्यायचे आणि बाकीचे स्वीकारायचे नाही, असं करूनही चालणार नाही. प्रबोधनकारांबरोबरच मी यशवंतराव चव्हाणही वाचलेले आहेत. मला राज्यातील जनतेला सांगायचं होतं. जातीपातीचा विचार जावा, हीच माझी भूमिका आहे’, असं राज ठाकरे म्हणाले.

Related posts