सोलापूर : जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सिलिंडरची मागणी प्रचंड वाढली आहे. एक-एक सिलिंडर मिळविण्यासाठी महापालिकेेसह खासगी रुग्णालयांची धावपळ सुरू आहे. नर्मदा हॉस्पिटलसाठी तातडीने सिलिंडर मिळावे यासाठी माजी आमदार दिलीप माने यांनी रविवारी रात्री १२ ते ४ वाजेपर्यंत होटगी रोड एमआयडीसीतील ऑक्सिजन प्लांटबाहेर ठिय्या मारला. सकाळी पुन्हा या ठिकाणी जाऊन सिलिंडर घेऊन गेले.
जिल्ह्यात टेंभुर्णी, चिंचोली एमआयडीसी आणि होटगी रोड येथील एमआयडीसीमध्ये ऑक्सिजनची निर्मिती होते. जिल्हा प्रशासनाच्या दाव्यानुसार या तीन प्लांटमध्ये एकूण ४६ मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होते. सध्या जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी दररोज ५६ मेट्रिक टन ऑक्सिजन आवश्यक असल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा आहे. सिव्हिल हॉस्पिटल, मार्कंडेय हॉस्पिटलसह इतर मोठ्या रुग्णालयांना परराज्यातून लिक्वीड ऑक्सिजन मिळतो. राज्यात सर्वत्र ऑक्सिजनची टंचाई असल्याने जिल्ह्यातील रुग्णालयांना बाहेरून पुरवठा होण्यास विलंब लागत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऑक्सिजनची अधिक मागणी आहे. सर्वच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड वाढविण्यात आले आहेत. ऑक्सिजन लेव्हल कमी झालेले अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल होत असल्याने ताण वाढला आहे. एक-एक सिलिंडरसाठी रुग्णालयांची धावपळ सुरू आहे.
