सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून इंधन दरातील वाढ सुरूच असून सलग तिसऱ्या दिवशी (बुधवारी) तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात प्रत्येकी २५ पैशांनी वाढ केली. ताज्या दरवाढीनंतर इंधन दर सर्वकालीन उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. मार्जिन दरात सुधारणा करण्याचा तेल कंपन्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आणखी काही दिवस इंधन दरात वाढ होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल आल्यापासून इंधन दरातील वाढ सुरू आहे. गेल्या ४ मे पासून आतापर्यंत सातवेळा इंधन दरात वाढ करण्यात आली आहे. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे प्रती लीटरचे दर ९१.८० रुपयांवरून ९२.०५ रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे डिझेलचे दर ८२.३६ रुपयांवरून ८२.६१ रुपयांपर्यंत वाढले आहेत. त्यामुळे देशाच्या राजधानीतील इंधन दर सर्वकालीन उच्चांकी स्तरावर आहेत.
तर ताज्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर ९८.३६ रुपयांवर गेले असून डिझेल प्रतिलिटर ८९.७५ रूपयावर पोहचले आहे. याशिवाय चेन्नईत हेच दर क्रमशः ९३.८४ आणि ८७.४९ रुपयांवर तर कोलकाता येथे हे दर क्रमशः ९२.१६ आणि ८५.४५ रुपयांवर गेले आहेत.
previous post
