सोलापूर शहर आणि जिल्ह्यात येत्या 8 मे रात्री आठ वाजल्यापासून 15 मे सकाळी सात वाजेपर्यंत मेडिकल व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी रात्री पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर तसेच जिल्हा परिषद सीईओ दिलीप स्वामी उपस्थित होते.
सध्या शहर व जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्याचा आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. काही सेवा चालु असल्याने लोक बाहेर पडत असल्याचे लक्षात आल्याने कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले, मेडिकल दुकाने आणि आरोग्य सेवा वगळता इतर गोष्टीसाठी निर्बंध कडक केले आहेत.त्यामुळे भाजीपाला विक्रीसह किराणा दुकाने, हॉटेल, मॉल, बिअर दुकाने, वाईनशॉप, बेकरी,आडत दुकाने, खाजगी आस्थापना बंद राहणार आहेत. तर कृषी दुकाने सुरु राहतील. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन शंभरकर यांनी केले आहे. अन्यथा कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
