ठाण्यातील वर्तकनगर नाक्यावरील वेदांत या खासगी कोरोना रुग्णालयातील चार रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला असल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑक्सिजन संपल्यामुळेच रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला असल्याने हॉस्पिटलच्या बाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून ठाणे महापालिकेचे अधिकारी देखील रुग्णालयात पोहोचले आहेत. रुग्णालय प्रशासनाने तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची कबुली दिली असून हे मृत्यू ऑक्सिजनअभावी झाले नसल्याचे रुग्णालयाच्या वगीने स्पष्ट करण्यात आले आहे.
वाचा : आदित्य ठाकरेंनी ‘ते’ ट्विट डिलीट केल्याने नव्या चर्चेला उधाण, संजय राऊत म्हणाले…
वर्तकनगर नाक्यावर वेदांत या खासगी रुग्णालयामध्ये ऑक्सिजनअभावी 6 जणांचा मृत्यू झाला असल्याचा मेसेज व्हायरल झाला. त्यानंतर रुग्णालयामधील रुग्णांचे नातेवाईक संतप्त झाले. प्रकरण वाढू नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. घटनास्थळी आलेले आमदार निरंजन डावखरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली असून सर्व गैरव्यवहाराची चौकशी सिव्हिल सर्जन मार्फत करण्याची मागणी केली आहे. आम्ही दोन दिवस डॉक्टरांच्या संपर्कात होतो, पैसे भरून देखील योग्य उपचार मिळत नव्हते. रात्री आमचे डॉक्टरांशी बोलल्यानंतर डॉक्टर पीपीई किट्स घालून आम्हाला भेटण्यासाठी परवानगी देतील असे सांगण्यात आले. दरम्यान, सकाळी अचानक मृत्यू झाला असल्याचे आम्हाला सांगण्यात आले असून ऑक्सिजनअभावीच मृत्यू झाला असल्याचा आरोप रुग्णाचे नातेवाईक साधना पाटील यांनी केला आहे.
वाचा : कोरोनाचा विस्फोट! देशात २४ तासांत साडेतीन लाखांहून अधिक रुग्ण, २,८१२ मृत्यू
ठाणे महापालिका प्रशासनामार्फत मात्र अजून काही खुलासा करण्यात आला नाही. तर यासंदर्भात वेदांत रुग्णालयाचे डॉक्टर डॉ. अजय सिंग यांच्याशी संपर्क साधला असता केवळ तीन मृत्यू झाले असून हे मृत्यू ऑक्सिजनअभावी झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ऑक्सिजनचा मीठ टँक संपला होता. मात्र जम्बो टँक शिल्लक होता. आयसीयूमध्ये 25 ते 30 गंभीर रुग्ण असून 12 तासांत हे तीन मृत्यू झाले असल्याचे सिंग यांनी सांगितले.
