महाराष्ट्र

Zydus Cadila च्या विराफीन औषधाला भारतात परवानगी

७ दिवसांत करोना पेशंट निगेटिव्ह; कंपनीचा दावा!

गेल्या वर्षभराहून अधिक काळ देशात करोनाशी लढा सुरू आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात करोनासाठीचं लसीकरण देखील सुरू झालं. मात्र, अजूनही देशात रोज शेकडोंनी रुग्ण करोनामुळे मरत आहेत. असं असताना देशासाठी करोनाच्या लसींसोबतच अजून एक आशेचा किरण दिसू लागला आहे. Zydus Cadila या कंपनीचं Virafin हे औषध करोनावरील उपचारांसाठी म्हणून देशात वितरीत करण्यासाठी DCGI नं मान्यता दिली आहे. येत्या काही दिवसांमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी हे औषध डॉक्टरांच्या परवानगीने वापरता येणार आहे. या औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल सकारात्मक असून औषध दिल्यानंतर ७व्या दिवशी करोनाबाधित व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह येत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
झायडसनं जाहीर केलेल्या निकालांनुसार, हे औषध यशस्वी ठरण्याचं प्रमाण तब्बल ९१.१५ टक्के आहे. अर्थात, हे औषध दिलेल्या करोनाबाधितांपैकी ९१.१५ टक्के रुग्णांचे अहवाल हे ७ दिवसांमध्ये निगेटिव्ह आले आहेत. विराफीनचा एकच डोस द्यावा लागत असून तो इतर आजारांवरील इंजेक्शन्सप्रमाणेच त्वचेच्या खाली द्यावा लागत असल्याचं देखील कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
“रेमडेसिविर, लस पुरवठा वाढवा”, पंतप्रधानांसोबतच्या चर्चेत मुख्यमंत्र्यांची मागणी
दरम्यान, विराफीन दिल्यानंतर कोविड रुग्ण वेगाने बरे होण्यास मदत होत असल्याचं देखील कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. रुग्ण लवकर बरे होत असल्यामुळे त्यांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज कमी होते. तसेच, रुग्णाला रेस्पिरेटरी डिस्ट्रेस देखील कमी होतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

Related posts