उस्मानाबाद  तुळजापूर

पिंपळा खुर्द येथे विठ्ठल नरवडे यांचे कोरोना लसीविषयी प्रबोधन व जनजागृती.

सर्वसामान्य व वयोवृद्ध महिला यांच्यात आणली लसीबाबतची मानसिकता

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक – मराठवाडा.

तुळजापूर – पिंपळा (खु) ता. तुळजापूर येथील शिक्षक श्री. विठ्ठल नरवडे (सर) यांनी यावेळी एक आगळा-वेगळा उपक्रम राबविला आहे. पिंपळा खुर्द येथे विठ्ठल नरवडे यांनी कोरोना लसीविषयी प्रबोधन व जनजागृती उपक्रम राबविला आहे. या जनजागृती मुळे सर्वसामान्य व वयोवृद्ध महिला यांच्यात लसीबाबतची मानसिकता त्यांनी आणली आहे.

श्री. विठ्ठल नरवडे (सर) हे सतत आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे चर्चेत असतात. यावेळी ग्रामीण भागातील वयोवृद्धामध्ये कोरोनाच्या लसीबाबत गैरसमज व भीती दूर करून त्यांना लस घेण्यासाठी पिंपळा खुर्द शाळेतील शिक्षक विठ्ठल नरवडे यांनी त्यांचे प्रबोधन व प्रोत्साहित करण्याचे कार्य सुरू केले आहे. गावात कोरोनाविषयीचे सर्वेक्षण व त्याची जागृकता निर्माण करण्याचे काम करत असताना येथील नागरिकांशी संवाद साधून त्यांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. त्यांनी मनमोकळेपणाने बोलून मनातील संशय व लसीबद्दलचे त्यांचे प्रश्न सांगितले. विविध कारणांमुळे त्यांच्यात उदासीनता व भीती दिसून आली. गावात कोरोना पर्यवेक्षक म्हणून काम करणारे श्री नरवडे यांनी त्यांच्या मनातील संशय ,भीती दूर करून ते लसीकरणासाठीची मानसिकता तयार करत आहेत. यासाठी वैयक्तिक भेटी घेऊन मार्गदर्शन ही सुरु आहे.

शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण खूप कमी आहे. तेथे लोकांचे प्रबोधन करणे व लसीबाबत लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. अशिक्षित लोकांत चुकीची माहिती व गैरसमज अधिक दिसून येत आहेत. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लसीविषयी लोकांच्या मनात विश्वासाहर्ता आणि पारदर्शकता वाढीसाठी आरोग्य दूत व जनता यांच्यात सुसंवाद असणे गरजेचे आहे. श्री नरवडे हे स्थानिक पदाधिकारी, डॉक्टर, आरोग्य सेविका यांच्या मदतीने पात्र लोकांशी संवाद साधत आहेत .याबरोबरच मास्क वापरणे ,सामाजिक अंतर राखणे व वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा अवलंब ही सर्वांनी करावा असेही आवाहन सर्वांना करत आहेत.

लस घेतल्यानंतरही कोरोना होतो ,लस घेतल्याने आजारी पडणे व इतर त्रास सुरु होतात. अशा विविध गैरसमजुती लोकांत पाहायला मिळतात. अशा विविध गैरसमजुती लोकांच्या मनातून काढून त्यांच्यात लस घेण्याविषयीचा विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. लस ही पूर्णपणे सुरक्षित असून लस ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, लस घेतलेली व्यक्ती संसर्गापासून वाचते, तसेच ती इतरांनाही बाधित करत नाही, लस घेतल्याने “ब्रेक द चैन” हे यशस्वी होऊन, संसर्ग रोखला जाऊन कोरोनाला दूर ठेवता येणार आहे. सध्या आरोग्य यंत्रणेवर कोरोनाच्या महामारीने मोठा ताण आणला आहे. समाजात सर्वत्र भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. त्रिसूत्रीचा अवलंब करण्याबरोबरच पात्र व्यक्तीने लस घेणे हे ही महत्त्वाचे आहे. लसीकरण हाच कोरोना विरुद्धच्या लढाईतील सर्वात प्रभावी व परिणामकारक उपाय आहे. लस घेणाऱ्याने दोन दिवस विश्रांती घ्यावी व आपण लस घेतल्यानंतर इतरांनाही प्रोत्साहित करावे असे सांगितले जात आहे.

पिंपळा खुर्द गावात कोरोना सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून सरपंच, उपसरपंच व इतर सर्व पर्यवेक्षकांच्या मदतीने कोरोना विषयी जनजागृती केली जात आहे.

=====================

लसीकरणाबाबतची उदासीनता आणि अज्ञान हे रोग प्रतिबंधात्मक उपाय यांच्या प्रयत्नांना निष्प्रभ करते. आपणास कोरोना विरुद्धची लढाई जिंकायची आहे. त्यासाठी जनजागृती करण्याचे काम करत आहोत. कोरोना संसर्ग रोखण्यासह लसीकरण वाढवण्यासाठी सर्वांच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत.विशेष करून वृद्धांना लसीबद्दलचा विश्वास निर्माण करत आहोत.

– श्री.विठ्ठल नरवडे , (शिक्षक पिंपळा खुर्द)

======================

Related posts