उस्मानाबाद 

जिल्हाधिकारी कार्यालयातच खा. ओमराजे निंबाळकर व आ. राणा पाटील यांच्यात शाब्दिक चकमक.

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीत जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली आहे. पीकविम्याच्या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक वाद वाढल्यानंतर दोघांनीही एकमेकांचा एकेरी उल्लेख केला. जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्यासमोरच हा प्रकार घडला असून या घटनेनं जिल्ह्यात राजकीय तणाव निर्माण झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आज जिल्ह्याधिकारी कार्यालयात आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची पीकविम्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होती. या बैठकीला नंतर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हेदेखील पोहोचले आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी मांडण्यास सुरुवात केली. पीकविमा देताना कंपन्यांकडून भेदभाव केला जात आहे. तसंच प्रशानाकडून पंचनाम्याची पावती घ्या, असं आमदार राणा पाटलांनी शेतकऱ्यांना सांगितलं. मात्र प्रशासनाकडे पंचनाम्याच्या पावत्याच नाहीत, तर शेतकऱ्यांची फसवणूक का केली? असा संतप्त सवाल खासदार निंबाळकर यांनी उपस्थित केला.

यावेळी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या आरोपांना उत्तर देताना राणा पाटील यांनी त्यांचा बाळा असा उल्लेख केला. त्यानंतर भडकलेल्या ओमप्रकाश राजेनिंबाळकरांनी ‘तू तुझ्या औकातीत राहा, तुझी आणि तुझ्या खानदानाची औकात आणि संस्कार सर्वांनाच माहीत आहेत,’ असं म्हणत राणा पाटलांचा समाचार घेतला. हा वाद टोकाला गेल्यानंतर काही वेळ जिल्हाधिकारी कार्यालयात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

दरम्यान, ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यातील कौटुंबिक वाद सर्वश्रुत आहे. ओमप्रकाश यांचे वडील पवन राजेनिंबाळकर यांच्या खुनानंतर राणा पाटील यांचे वडील पद्मसिंह पाटील यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. कौटुंबिक वादाची किनार असल्याने हे दोन्ही लोकप्रतिनिधी जेव्हा जेव्हा आमने-सामने येतात, तेव्हा तेव्हा राजकीय तणावाची परिस्थिती निर्माण होती. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या प्रकारानेही याच वादाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

Related posts