उस्मानाबाद  तुळजापूर

वात्सल्यचे काम आदर्शवत – पद्मश्री नीलिमा मिश्रा.

मंगरूळ:-एकल महिलांमधील वात्सल्यचे काम आदर्शवत आहे असे प्रतिपादन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त, पद्मश्री नीलिमा मिश्रा यांनी महिला प्रबोधन मेळाव्यात केले.

रोटरी क्लब,रोटरी सेवा ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या सहकार्याने वात्सल्य सामाजिक संस्थेने मंगरूळ येथे महिला प्रबोधन मेळावा आयोजित केला होता.एकल महिलांचे प्रश्‍न,जगण्यासाठी करावी लागणारी धडपड,स्वाभिमानी जीवन जगण्याचे मार्ग या विषयावर नीलिमा मिश्रा यांनी 11 गावांमधून आलेल्या 221 महिलांना बोलते केले.भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन च्या माध्यमातून पद्मश्री नीलिमा मिश्रा यांनी गरजू महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचा संकल्प केला आहे.त्यानिमित्त त्या राज्यभर प्रवास करत आहेत.

चूल आणि मूल यापर्यंतच मर्यादित असणारी महिला आता समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात दैदिप्यमान यश मिळवत आहे,आणि आपणही आता अडचणींचा बाऊ न करता त्यातून मार्ग काढून स्वतःच स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे त्यासाठी रोटरी,वात्सल्य सारख्या संस्था व मी स्वतः केव्हाही मदत करायला तयार आहे.असे मत यावेळी त्यांनी मांडले.व्यासपीठावरून खाली उतरून सर्व महीलांच्या समोर बसून अनौपचारीक व गोष्टीरूपाने स्वयंरोजगार,स्रीधन,उद्योग प्रशीक्षण,मीर्च मसाला प्रकल्प यासंदर्भात संवाद साधला व आलेल्या महीलांनीही मोकळेपणाने सहभाग घेतला.

प्रारंभी हलगीच्या निनादात,महिलांनी औक्षण करून नीलिमा मिश्रा यांचे स्वागत केले.वात्सल्य संस्थेच्या माध्यमातून चालणाऱ्या अनेक उपक्रमांची त्यांनी माहिती घेतली.सदरील कार्यक्रमास उस्मानाबाद येथील प्राचार्या डॅा.अनार साळुंके,रो.लता चन्ना,डॅा.मिना जिंतूरकर, उद्योजक श्री.रवींद्र साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती श्री.साळुंके म्हणाले की जगभरातील वंचित बांधवामध्ये रोटरीने दखल घेण्यासारखे काम केले आहे.रोटरी क्लब व रोटरी सेवा ट्रस्ट या एकल भगिनींच्या पाठीशी नेहमीच असेल असे त्यांनी म्हटले.

यावेळी व्यासपीठावर पद्मश्री नीलिमा मिश्रा,रोटरी क्लब उस्मानाबाद चे अध्यक्ष श्री.सुनील गर्जे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विशाल सूर्यवंशी यांनी केले,कार्यक्रमाच्या सुरुवातीला युवा भारुडकार कृष्णाई उळेकर यांनी सादरीकरण केले.याप्रसंगी 11 गावातील 221 महिलांसह,संस्था पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.सदरील कार्यक्रम वात्सल्य सामाजिक संस्थेच्या मंगरूळ येथील भुजंग काका घुगे स्मृती सभागृहात संपन्न झाला.

Related posts