Blog

वंद.तुकडोजी झाले राष्ट्रसंत !

पवित्र ग्रामगीता ग्रंथात मुख्यविषय हे ८ पंचक रुपात मांडले आहेत. प्रत्येक पंचकात पांच-पांच अध्याय हे भिन्न-भिन्न उपविषयांच्या विश्लेषणातून विषद केलेले आहेत. त्यात एकूण अध्याय संख्या ४१ आहे. ते असे –
[ अ ] सद्धर्म मंथन पंचक :- (१) देवदर्शन, (२) धर्माध्ययन, (३) आश्रयधर्म, (४) संसार-परमार्थ, (५) वर्ण-व्यवस्था.
[ आ ] लोकवशीकरण पंचक :- (६) संसर्ग-प्रभाव, (७) आचार-प्राबल्य, (८) प्रचार-महिमा, (९) सेवासामर्थ्य, (१०) संघटनशक्ती.
[ इ ] ग्रामनिर्माण पंचक :- (११) ग्राफिक्स, (१२) ग्रामशुद्धी, (१३) ग्रामनिर्माण कला, (१४) ग्राम-आरोग्य, (१५) गोवंश-सुधार.
[ ई ] दृष्टिपरिवर्तन पंचक :- (१६) वेष-वैभव, (१७) गरीबी-श्रीमंती, (१८) श्रम-संपत्ती, (१९) जीवनशिक्षण, (२०) महिलोन्नती.
[ उ ] संस्कारशोधन पंचक :- (२१) वैवाहिक जीवन, (२२) अंत्यसंस्कार, (२३) सणोत्सव, (२४) यात्रा-मेळे, (२५) देव-देवळे.
[ ऊ ] प्रेमधर्मस्थापन पंचक :- (२६) मूर्ति-उपसना, (२७) सामुदायिक प्रार्थना, (२८) प्रार्थना व विश्वधर्म, (२९) दलित-सेवा, (३०) भजन-प्रभाव.
[ ए ] देवत्वसाधन पंचक :- (३१) संतचमत्कार, (३२) संतस्वरुप, (३३) अवतारकार्य, (३४) प्रारब्धवाद, (३५) प्रयत्नप्रभाव.
[ ऐ ] आदर्श जीवन पंचक :- (३६) जीवन-कला, (३७) आत्मानुभव, (३८) ग्राम-कुटुंब, (३९) भू-वैकुंठ, (४०) ग्रंथाध्ययन आणि (४१) ग्रंथ-महिमा. असा हा संपूर्ण ग्रंथच अभ्यासपूर्ण व ज्ञानवर्धक आहे. ही ग्रंथरचना म्हणजेच राष्ट्रसंतांच्या वाङ्मयसेवेची परिपूर्तीच होय. ते काव्य रचताना अथवा भजन म्हणताना स्वतःचा उल्लेख ‘तुकड्या’ वा ‘तुकड्यादास’ असा करीत असत –
“तुकड्या कहे आँधी लाऊँ ।
मैं भी मर कर जी जाऊँ ।।”
वंद.राष्ट्रसंत हे देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य चालीरिती, रुढीपरंपरा, अंध श्रद्धा, अंधविश्वास, जातीभेद, धर्मभेद कायम नष्ट व्हाव्यात म्हणून अविरत कष्टत होते. अमरावती जिल्ह्यातील मोहरी येथील गुरुकुंज आश्रमाची स्थापना हेही त्यांच्या जीवनातील विलक्षणिय कार्य होय. त्यांची सामुदायिक वा सर्वधर्मीय प्रार्थनेसाठी आग्रही भूमिका होती. ते सांगत –
“भक्ति चमत्कारादिसाठी । म्हणोनि झाली फजिती मोठी ।
घरदारहि लावोनि नेले पाठी । लुबाडले ढोंगी बुवांनी ।।”
[ पवित्र ग्रामगीता : दृष्टिपरिवर्तन पंचक : अध्याय १६ वा : वेष-वैभव : ओवी ९१ वी ]
त्यांनी विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार केला. धर्मातील अनिष्ट प्रथा व कर्मकांडांना त्यांनी फाटा दिला. त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार-प्रसार आपल्या आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय प्रबोधनाच्या माध्यमातून केला. महिलोन्नती हा विषयसुद्धा ते तितक्याच तळमळीने व तन्मयतेने हाताळत असत. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था व राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवरच अवलंबून कशी असते? हे त्यांनी समाजाला पदोपदी पटवून दिले –
“ते हे स्वतः सिद्ध माऊलीपण । स्त्रियेअंगी सहजचि घडण ।
त्याचा विकास करावया पूर्ण । उत्तम शिक्षण पाहिजे ।।”
[ पवित्र ग्रामगीता : दृष्टिपरिवर्तन पंचक : अध्याय २० वा : महिलोन्नती : ओवी क्र.२६ ]
देशातील युवकवर्ग हा राष्ट्रविकासाचा आधारस्तंभ आहे. म्हणून त्याने बलोपासना करावी. म्हणजे तो समाज व देशाचे संरक्षण करण्यासाठी समर्थ राहिल. वंद.महाराजांनी आपल्या तीक्ष्ण लेखनीद्वारे व्यसनांवर सडेतोड प्रहार केले आहेत –
“पान तंबाखू खावोनि आला । प्रवचनी कीर्तनी शाळेत बसला ।
हसती श्रोते विद्यार्थी त्याला । ‘व्यसने सोडा’ बोलता ।।”
[ पवित्र ग्रामगीता : आदर्श जीवन पंचक : अध्याय ४१ वा : ग्रंथ महिमा : ओवी २२ वी ]
त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदीतही विपुल लेखन केले. एकदा त्यांनी राष्ट्रपतिभवनात खंजिरी भजन ऐकवले. त्यावर मंत्रमुग्ध होऊन तत्कालीन राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांनी वंदनीय तुकडोजी महाराजांना ‘राष्ट्रसंत’ म्हणून संबोधिले होते. तेव्हापासून भारतीय लोक त्यांच्या नावापूर्वी राष्ट्रसंत लावून त्यांना गौरवू लागले आहेत. त्यांच्या कल्याणकारी विचार व कार्यांचा प्रचार व प्रसार आज ‘अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ’ या नावाने शहरांत व गावोगावी केले जात आहे –
“गुरुदेव हमारा प्यारा, है जीवन का उजियारा !”
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग दिनांक ११ ऑक्टोबर १९६८ रोजी केला. त्यांच्या स्मृतीसप्ताह निमित्त या लेख प्रपंचाद्वारे त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम !
!! जय गुरुदेव !! [ समाप्त ]
नियमित व दररोज वाचा, सांध्य दैनिक ‘राजस्व!’

लेखक – श्री.कृ.गो.निकोडे गुरुजी.
(मराठी साहित्यिक व संतसाहित्याचे गाढे अभ्यासक)
मु. वंद.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक,
रामनगर वार्ड नं.२०, गडचिरोली,
ता.जि. गडचिरोली.
फक्त व्हा.नं. ७४१४९८३३३९.

Related posts