महाराष्ट्र

केंद्राकडून लस न मिळल्यास तीन दिवसांनंतर राज्यातील लसीकरण बंद पडणार : आरोग्यमंत्री टोपे

सध्या महाराष्ट्रात १४ लाख लसीचे डोस उपलब्ध आहेत. यापुढे लस वेळेत न मिळाल्यास ३ दिवसात महाराष्ट्रात लसीकरण बंद पडेल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद दिली. आठवड्याला किमान ४० लाख लसीचा पुरवठा केंद्र सरकारने करावा, अशी विनंती पोटतिडकीने केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना केली असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगितले.
यावेळी टोपे म्‍हणाले, राज्‍यातील कोरोना रुग्‍णांची वाढती संख्‍या आणि लसीकरणासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशी चर्चा केली आहे. सध्या महाराष्ट्रात १४ लाख लसीचे डोस उपलब्ध आहेत. लस वेळेत न मिळाल्यास ३ दिवसात महाराष्ट्रात लसीकरण बंद पडेल. आठवड्याला किमान ४० लाख लसीचा पुरवठा केंद्राने करावा. अशी विनंती हर्षवर्धन यांना केली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
कठोर निर्बंध घालूनही गर्दी टाळण्याठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारच्या सर्व निकषाचे पालन राज्यात होत आहे. रोज ६ लाख लसीकरण करण्याचे केंद्राचे आव्हान आहे. ते पूर्ण करण्याच्या वाटेवर महाराष्ट्र आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लसीचा पुरवठा नसल्याने लसीकरणास अडचण येत आहे. त्यामुळे केंद्राने राज्याच्या मागण्याकडे लक्ष द्यावे, असेही ते म्‍हणाले. १८ ते २९ वर्षावरील सर्वांना लसीकरणाची परवानगी द्या, अशी मागणी देखील केंद्र सरकारकडे केली असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.
रेमडिसवर इंजेक्शनची साठेबाजी अजिबात खपवून घेणार नाही. गरज असेल त्यांनाच हे इंजेक्शन द्यावे. रेमडिसीवर ११०० ते १४०० वर विकू नये. रेमिडेसीवरचा वापर नियमांप्रमाणे करा. डॉक्टरांनी केवळ नफ्यासाठी याचा वापर करू नये, असे टोपे यांनी स्‍पष्‍ट केले.

Related posts