महाराष्ट्र

मुंबईत एक दिवस पुरतील इतक्याच लसी : महापौर

महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा योग्यरित्या होत नसल्याचा आरोप राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी लसी उपलब्ध नसल्यानं लसीकरण थांबवण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबईतील अनेक केंद्रांमध्ये लसी उपलब्ध नाहीत. तसंच मुंबईत केवळ एक दिवस पुरेल इतका लसींचा साठा उपलब्ध असल्याची माहिती मुंबईच्या महापौरकिशोरी पेडणेकर यांनी दिली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं.
“मुंबईतील काही लसीकरण केंद्रांवर लसीचा साठा शून्यावर आला आहे. त्यामुळे त्या ठिकाणचं लसीकरण थांबवावं लागलं आहे. आज आपल्याकडे ७६ हजार ते १ लाख लसींचे डोस येणार असल्याची माहिती मला माध्यमांकडून समजली आहे. परंतु याबाबत काही अधिकृत माहिती अद्याप मिळाली नाही,” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
“आपल्याला लोकांचे प्राण वाचवायचे आहेत. मग ते देशातील, राज्यातील, मुंबईतीलल कोणतेही असो. लोकसंख्येप्रमाणे लसींचं वाटप झालं पाहिजे. आता लसींचा साठा किती आहे याची माहिती लसीकरण केंद्राबाहेर लावण्यात येणार आहे,” अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणी अधिक गंभीर आणि सक्रिय आहेत. परंतु त्यांच्या हाताखालील लोकं मात्र याकडे गांभीर्यांनं पाहत नसल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी यावेळी केली.

Related posts