महाराष्ट्र

आयपीएल २०२१ ची संपूर्ण स्पर्धा स्थगित

नवी दिल्ली :
कोरोनाचा आयपीएलच्या १४ व्या हंगामास मोठा फटका बसला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याची माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली आहे. असे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.
आयपीएलमधील काही खेळाडू पॉझिटिव्ह असून यामुळे नियोजित सामने रद्द करावे लागले आहेत. आता संर्पूण स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे.
दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आयपीएल २०२१ तत्काळ थांबवा, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. तसेच यातून पुढील सामने मुंबईत हलविण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाला विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे बीसीसीआयसमोर पेच निर्माण झाला होता.
देशात बिकट परिस्थिती आहे. हे लक्षात घेऊन आयपीएल स्पर्धा रद्द करण्याचा विचार बीसीसीआय आणि दिल्ली क्रिकेट असोसिएशनने करावा असे याचिकेत म्हटलं आहे. ॲड. करण सिंग ठुकराल आणि सामाजिक कार्यकर्ते मोहन सिंह यांनी ही याचिका कोर्टात दाखल केली आहे. याआधी भारताचे माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनीही आयपीएल स्थगित करण्याची मागणी केली होती. दरम्यान, कोलकाता नाइट रायडर्स संघातील दोन खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे काल सोमवारी कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात होणारा सामना पुढे ढकलण्यात आला. आयपीएल वेळापत्रकानुसार हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर नियोजित होता. पण दोन खेळाडू पॉझिटिव्ह आल्याने सामन्याचे वेळापत्रक बदलण्यात आल्याचे आयपीएलने अधिकृतरित्या स्पष्ट केले होते.

Related posts