Blog

कोरोनात डॉक्टर देव होते, आता कसाई कसे झाले.

कोरोनाच्या सुरवातीला एप्रिल,मे महिन्यात लोकांना आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरला लोक देव मानीत होते. सर्वत्र त्यांच्या सेवेचा गुणगौरव होत होता.त्यावेळी राजकारणी लोक हताश झाले होते. तेच राजकारणी आता कोरोनाच्या आरोग्य सेवा देणाऱ्या प्रत्येक भ्रष्टाचारात मोठ्या संख्येने सक्रिय सहभागी झाले आहेत.
आर्थिक मानसिक संकटात सापडलेल्या अनेक माणसांना कुटुंबातील माणूस बळी जातांना हताशपणे पाहण्याची वेळ आली आहे. भ्रष्टाचाराने पोखरलेल्या आरोग्य सेवा व्यवस्थेमुळे आई-बाप,मुलगा,मुलगी गमावलेल्यांनी याला जबाबदार असणाऱ्यांच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढलं पाहिजे. कारण “म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो त्यांचे काय?.” अशी परिस्थिती आज कोरोना लॉकडाऊन मुळे झाली आहे.
कोरोना सुरवातीच्या एप्रिल,मे महिन्यांतील आरोग्य सेवा सुव्यवस्था लाभदायक होती, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ती अवस्था आणखीनच भयावह झाली आहे, चीनमधून सुरू झालेल्या या संकटाची दाहकता प्रत्येक देशात पोहचली, त्यांनी त्यावर वेळीच उपचार उपाय योजना करून नियंत्रण ठेवले. भारतात फक्त लॉक डाऊन सुरू आहे. बाकी उपाय कुठे आहेत?. भारतात मात्र कुणाचा बाप,कुणाची आई तर कुणाचा भाऊ तर कुणाची बहीण, कुणाचे मित्र तर कुणाचे नातेवाईक, बळी पडला, ज्यांनी या परिस्थितीचा सामना केला, ज्यांनी हे दुःख भोगलं त्यांची परिस्थिती काय झाली असेल, हे त्यांनाच माहीत, कारण “ज्याचं जळतं, त्यालाच कळतं!” अनेक ठिकाणी अशी अवस्था होती की, आपला कोरोना होऊन मेलेला बाप जेव्हा घरातून उपचारासाठी गेला होता, त्यांनंतर त्याला शेवटचं पाहता सुध्दा आलं नाही, अग्नी देता आला नाही, जवळ सुध्दा येऊ दिलं नाही, आणि बापाचा प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला मृतदेह थेट स्मशान भूमीत पोचविला. तो खरंच आपला नाते वाहिक होता की नाही हे तपासू दिले नाही.काहींना तर लांबून सुध्दा अंतिमदर्शन घेता आलं नाही, त्यावेळी हताश झालेल्या त्याच्या मुलाला, मुलीला, बायकोला,आईला काय वाटलं असेल?. त्यांची मानसिकता अवस्था काय झाली असेल, त्यांचे वर्णन शब्दांत करता येते नाही.
कोरोनाच्या भीतीमुळे अनेक मृत्यू हॉस्पिटलमध्ये दाखल करून न घेतल्यामुळे, वेळेत उपचार न मिळाल्यामुळे, ऑक्सिजन विना, व्हेंटिलेटर भेटलं नाही म्हणून व अशा अनेक कारणामुळे झाले, प्रत्येकजण महामारीला दोष देऊन अश्रू ढाळत आहेत, पण या परिस्थितीला जबाबदार कोण?. राज्य सरकार की केंद्र सरकार?. हा विचार आपण गांभीर्याने करणार आहोत की नाही?. त्यामुळेच ही ढासळलेली आरोग्य सेवा व्यवस्था भ्रष्टाचार करून किती लोकांचे बळी घेणार हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटना नियमितपणे समोर येत आहेत. भारतीय लोकशाहीचे चारी खांब कोसळले आहेत,त्यातील एक खांब चॅनल प्रिंट मीडिया मूलभूत अधिकार, हक्क, समस्या, उपाय योजना यावरच बोलत लिहत नाही.केंद्र सरकार राम मंदिर, सुशांतसिंग, आता कंगना याशिवाय देशात कोणत्याही समस्या दाखवीत नाही.राज्य सरकार कसे अडचणीत येईल यावरच सर्व मोदी भक्त आणि गोदी मिडिया आपली शक्ती खर्च करीत आहे.केंद्र सरकारने राज्याला आरोग्यसेवे साठी काय मदत केली आणि काय केले पाहिजे होते.त्यावर कोणीच आवाज उचलत नाही.
जगातील इतर देशाच्या तुलनेत भारतात कोरोना ने नागरिकांना दाखवून दिले की तुम्हाला कशाची अतिआवश्यक गरज आहे, प्रत्येक तालुक्यात सुसज्ज हॉस्पिटल पाहिजे, स्वातंत्र्य झाल्यापासून आज पर्यंत आरोग्य सेवा व्यवस्थेवर किती निधी उपलब्ध करून दिला आणि किती खर्च केला. शून्य ते सहा वर्षाच्या मुलांचे,गरोदर मातांचे आणि दुध पिणाऱ्या बाळाच्या आईचे संगोपना, आरोग्याची काळजी घेण्यासाठी जागतिक बँक आर्थिक साह्य पुरविते त्यात अंगणवाडी सेविका,मदतनीस बाल प्रकल्पात १९७४ साला पासून मानधनावर काम करतात. भारत सरकारचा आरोग्य निधी कुठे जातो, तो कागदावर असतो आणि त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असतो. राज्यकर्त्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत व डॉक्टरांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच आप आपल्या परीने चांगभलं करून घेतात.नागरिकांचे काय?.त्यांनी आणलेल्या रुग्णांना काय मिळणार आहे हे विचारण्याचा अधिकार आहे की नाही?.कोरोनात डॉक्टर देव होते, आता कसाई कसे झाले.
हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर नातेवाईकांनी तिथंच पायरीवर कुठं तरी बसून जेवायचं, तिथंच कुठं तरी झोपायचं. त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या काहींना तर असं वाटतं की आपण रुग्णांवर उपचार करतो म्हणजे उपकारच करतो, पण उपचार करून घेणारा रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक छाती ठोकून का सांगत नाहीत, की हे हॉस्पिटल माझं आहे, मी कर भरतो, रुग्णांना ने – यान करण्यासाठी रुग्णवाहिका कायमस्वरूपी पाहिजे. रुग्णासाठी स्ट्रेचर,औषधे आणि अतिआवश्यक सेवा देणारे कामगार कर्मचारी डॉक्टर नियमितपणे हजर राहिले पाहिजे.ते सरकारी सेवा देणारे कर्मचारी आहेत मालक नाहीत.ते इतरांसारखे उत्पादन उत्पन्न देणारे कामगार नाहीत.तर नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणारे सेवेकरी आहेत. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे नागरिकांना मुळात ह्याची माहिती नाही.आणि सेवेकरांना जाणीव नाही. हे सगळं त्याच्याच पैशातून चालते त्याला हे माहीतच नाही, की तो या देशातल्या श्रीमंत लोकांपेक्षा कोणती ही कर सवलत न घेता जास्त कर भरतो.
सरकारी हॉस्पिटल मध्ये योग्य सेवा मिळत नाही असे सांगणारे सरकारी डॉक्टर रुग्णाच्या नातेवाहीकाना खाजगी हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगतात. अनेक ठिकाणी सरकारी योजनेच्या नावाखाली रुग्णाच्या नातलगांची आर्थिकदृष्ट्या लूट केली जात आहे, अनेक गरजू रुग्णांना त्यांच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन रुग्णाचा आरोग्य योजने मधून लाभ घेण्याचा हक्क नाकारला जातोय, अनेकवेळा तर योजनेतून उपचार करून रुग्णांकडून पैसे घेतले जातात व रुग्णाची व शासनाची दुहेरी लूट केली जाते, तर कधी एकदम हीनदर्जाचे उपचार करून खोटी कागदपत्रे रंगवून शासनाकडून मात्र उच्च दर्जाच्या उपचाराचे पैसे लाटले जातात, आता कोरोनाकाळात हॉस्पिटलवर बिलांच्या बाबतीत शासनाने निर्बंध लावले, पण त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे कुठे होते?. रुग्णांची लूट कशी केली जाते.म्हणजेच अनावश्यक चाचण्या,इंजेक्शन,औषधे रोज प्रत्येक रुग्णाकडून 3 – 3 पीपीई कीट, मास्क नातलगा कडून मागविल्या जातात.मग सरकारी हॉस्पिटल काय देते?.या विरोधात रुग्णाचा नातलग बोलल्यास त्याला आणखी त्रास दिला जातो त्यात रुग्ण दगावण्याची जास्त शक्यता असते.अशी घटना डोळ्यासमोर पण घडली तर नातेवाहिक सरकारी हॉस्पिटल मध्ये डॉक्टर,नर्स यांना मारहाण करतात. म्हणूनच तक्रार करायला सामान्य माणूस धाडस करत नाही, आणि खासगी हॉस्पिटल बाबत अशी ताकार केली तर त्या हॉस्पिटलवाल्यांचे राजकीय दलाल नेते सामान्य माणसांना धमक्या द्यायला येतात.पोलीस ही खाजगी हॉस्पिटलच्या डॉक्टर मालकांना योग्य मदत करतात.कारण कोरोनात डॉक्टर देव होते, मग आता कसाई कसे झाले.
कोरोना सारख्या कठीण परिस्थितीत अनेक डॉक्टर,नर्स यांनी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची निस्वार्थपणे सेवा केली म्हणून लोक त्यांना देव मानीत होते.अशा डॉक्टरांना अनेक संस्थांनी कोविंद योद्धा म्हणून गौरव केला आहे. कोविड योध्याच्या योगदानाची किंमतच होऊ शकत नाही, पण पैशासाठी रुग्णाच्या जिवाशी खेळणारी प्रवृत्ती ज्या डॉक्टर मध्ये आहे त्यांना जाहीर पणे ठेचून काढणे आवशयक आहे. म्हणूनच नागरिकांनी विचार करण्याची मानसिकता बदलली पाहिजे.परीस्थिती बदलण्यासाठी संघटितपणे लढलं पाहिजे. कोणत्या राजकीय पक्षाच्या भरोशावर बसू नका सर्व एकाच माळेचे मनी आहेत.प्रत्येकाची साईज कमी जास्त असू शकते.जिथे आर्थिक मदत मिळण्याची शक्यता असते त्यांनाच ते मदत करतात.म्हणूनच असंघटीत कष्टकरी कामगार,मजुरांनी,शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी संघटीत होऊन सनदशीर मार्गाने न्याय,हक्क आणि मुलभूत अधिकारासाठी संघर्ष केला पाहिजे.भारतीय राज्य घटना म्हणजे संविधान लिह्णाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवले.मागितल्याने मिळत नाही संघर्षा शिवाय पर्याय नाही.म्हणूनच विचार करा कोरोनात डॉक्टर देव होते, आता कसाई कसे झाले.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप मुंबई

Related posts