महाराष्ट्र

सोमय्यांकडून INS विक्रांतच्या नावाखाली देशातील सर्वात मोठा घोटाळा

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्या यांनी ५७ कोटी रुपये गोळा केले असून ही रक्कम अजून जास्त असण्याची शक्यता असल्याचं संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. जर किरीट सोमय्यांना केंद्रीय सुरक्षाव्यवस्था दिली असेल तर केंद्र सरकराने या देशाच्या सुरक्षेसाठी खेळणाऱ्या देशद्रोही व्यक्तीला सुरक्षा देत देशाशी धोका केला आहे असा संताप यावेळी त्यांनी व्यक्त केला.

“किरीट सोमय्या विक्रांत वाचवा असे टी शर्ट घालून फिरत असताना लाखो, करोडो लोकांनी त्यांना पैसे दिले. याशिवाय अनेक कंपन्यांकडून त्यांनी विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली कोट्यवधी गोळा केले. ही रक्कम ५७ ते ५८ कोटी होती अशी माहिती त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने दिली आहे,” असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

“महात्मा किरीट सोमय्या यांच्या मुलाखती मी वाचल्या. यावर त्यांनी या सरकारला देशभक्ती नाही असं म्हटलं होतं. २०० कोटी गोळा करणार असून ते राजभवनात जमा करु असं त्यांनी सांगितलं होतं. माझ्याकडे राज्यपाल कार्यालयातून आलेलं पत्र आहे. आरटीआय कार्यकर्त्याने राज्यपालांना २०१३, २०१४, २०१५ विक्रांतसाठी जे पैसे गोळा केले होते ते जमा झालेत का? अशी विचारणा केली. यावर राज्यपाल कार्यालयाने असे कोणतेही पैसे जमा करण्यात आलेले नाहीत असं उत्तर देण्यात आलं. देशाच्या सुरक्षेशी, राष्ट्रीय भानवेशी केलेली ही फसवणूक आहे. हा देशद्रोह आहे,” असा आरोप संजय राऊतांनी केली आहे.

देशद्रोही किरीट सोमय्यांनी ५७ कोटी जमा केले. पण हा आकडा १०० कोटींच्या वर असावं असं मला वाटतं अंस राऊत म्हणाले. आता आपल्याला तर काही समजलं नाही असं ते म्हणतील सांगत संजय राऊतांनी फोटो दाखवले.

“आम्ही चर्चगेट स्टेशनला त्या डब्यात ५ हजार टाकल्याचं मला अनेकांनी सांगितलं आहे. ही रक्कम कुठे गेली? कोणाच्या घशात गेली? ही रक्कम भाजपाने निवडणुकीत वापरली की किरीट सोमय्यांची कंस्ट्रक्शन कंपनीत वापरले?,” अशी विचारणा संजय राऊतांनी केली.

“हा देशद्रोहाचा गुन्हा होऊ शकतो. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली गोळा केलेले पैसे कोणाच्या खिशात गेले याची महाराष्ट्र सरकारच्या तपास यंत्रणांनी चौकशी केलीच पाहिजे, पण केंद्रीय तपास यंत्रणा जर पारदर्शक आणि निष्पक्ष असतील तर सीबीआय, इन्कम टॅक्स आणि भाजपाची पदाधिकारी असणारी ईडी यांनी चौकशी करावी. त्यांना काही सापडत नसेल तर मी मदत करेन,” असं संजय राऊतांनी सांगितलं. यात अनेक लोक आहेत पण सोमय्या या भ्रष्टाचाराच्या कटाचे सूत्रधार आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला.

“अनेक निवृत्त जवान, नेव्ही अधिकारी यांच्याशी बोलणं सुरु असून ते अस्वस्थ आहेत. आम्हीदेखील त्यांना पैसे दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे. विक्रांतवर काम करणाऱ्या नेव्हीच्या १० अधिकाऱ्यांनी ५०-५० हजार रुपये टाकले आहेत,” असं संजय राऊत म्हणाले.

Related posts