उस्मानाबाद 

एकही मुल पल्स पोलीओ लसीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या:-जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

उस्मानाबाद:- राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेअंतर्गत येत्या 17 जानेवारी रोजी जिल्हयात घेण्यात येणाऱ्या लसीकरण्याच्या कार्यक्रमात जिल्हयातील शून्य ते पाच वर्षातील एकही मुल वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या,असे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे दिले.
पल्स पोलीओ लसीकरणासंबंधित जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज श्री. दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, तेव्हा ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड,निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच. व्ही.वडगावे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.के.पाटील,जिल्हा समाज कल्याण अधिकारी एन.आर. चौगुले,जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी,जिल्हयातील आरोग्य विभागातील संबंधित सर्व अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

आपल्या देशातून पल्स पोलीओ रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी 1995-96 पासून देशात पल्स पोलीओ लसीकरण करण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. गेल्या सहा वर्षापासून भारतात एकही पोलीओचा रुग्ण आढळला नाही.त्यामुळे 13 जानेवारी 2014 पासून भारतातून पोलीओचे समूळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केले आहे,असे सांगून जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर म्हणाले की जिल्हयात या मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागात 1190 तर शहरी भागात 111 असे एकूण 1301 लसीकरण केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या मोहिमेत पाच वर्षांच्या आतील एक लाख 73 हजार 772 बालकांना लसीचा डोस देण्यात येणार आहे.

मागील मोहिमांचा आढावा घेतला असता स्थालांतरीत होणाऱ्या लोकसंख्येतील बालकं या लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही,त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या वस्त्या,वीट भटया,स्थलांतरीत मजूर, प्रवासास निघालेल्या प्रवाशांची बालकं यांना त्या त्या ठिकाणी लसीकरण करण्याची व्यवस्था करून त्यांना पोलीओचा डोस पाजला जाईल यांची दक्षता आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी घ्यावी,असे सांगून आशा सेविकांची उपस्थिती पोलीओ लसीकरण केंद्रावर राहील याची दक्षता घ्यावी,असेही श्री. दिवेगावकर यांनी सांगितले.

देशातील पोलीओ संपला आहे,आता कशाला डोस घ्यावयाचा असे काहींना वाटते पण आपणास देशातील पोलीओ रोगाचे समाजातून समूळ उच्चाटन करून आपले पोलीओ मूक्त भारताचे स्थान अबाधित ठेवावयाचे आहे, असे सांगून डॉ.फड यांनी आरोग्य विभागातील डॉक्टर,आरोग्य कर्मचाऱ्यांनी या कामात झोकून देऊन काम करावे,आपण गेली अनेक वर्षे हे काम नेटकेपणाने करत असल्याने त्याचा आपणास चांगला सराव झाला आहे,आपले काम चांगलेच होऊन आपली एकही त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही त्यानी यावेळी केली.

जिल्हयात येत्या 17 जानेवारी रोजी होणाऱ्या पल्स पोलीओ मोहिमेच्या तयारीची माहिती डॉ.वडगावे यांनी संगणकीय सादरी करणाव्दारे यावेळी दिली.
***

Related posts