Blog

आत्महत्या

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

———————————————————————————————

ती अरुंद पायवाट होती. तृप्ती त्याच वाटेनं जात होती. जाता जाता तिच्या मनात विचार होता की आपला जोडीदार कसा निघेल.
तृप्तीचं लग्न जुळलं होतं. नुकतेच तिला पाहूणे पाहायला आले होते. त्या पाहूण्यांनी तिला पसंत करुन सोयरीक पक्की केली होती. नव्हे तर तृप्तीलाही तो मुलगा आवडलाच होता.
तृप्ती पाहायला सुंदर होती. त्याचबरोबर ती लाजाळूही होती. मात्र तिचं आजपर्यतचं जीवन अतिशय कष्टात गेलं होतं. तिला त्या जीवनाचा तिटकारा येत नव्हता.
ती पाहायला जरी सुंदर असली तरी ती सकाळी रानात जात असे. गोव-या गोळा करीत असे आणि दहा वाजता गोव-या गोळा करुन घरी येत असे. कधी फुलं तोडायला जात असे. ती फुलं तोडून दहा वाजता ती घरी येत असे व घरी आल्यावर भराभर दोन घास पोटात कोंबून ती शाळेची तयारी करुन शाळेत जात असे. असं करीत करीत ती बारावी झाली होती. ती हुशार होती. पण तरीही घरची परिस्थीती बेताची असल्यानं ती शिक्षणाला पैसा लागते म्हणून व शिक्षणासाठी पैसा नव्हता म्हणून ती शिकली नाही. त्यातच त्या उपवर वयात लोकं भीतीही दाखवीत की सकाळी गोव-या वेचायला मुलींनी जावू नये. कारण गाईवाले लोकं चांगल्या चांगल्या मुली पळवून नेतात.
महाराष्ट्राचा तो आदिवासी भाग होता. त्या आदिवासी भागात शेळ्या मेंढ्या चारायला गुजरात, राजस्थानची माणसं येत. ह्या गुजरातला मुलींची संख्या कमी होती. कारण जन्मदर कमी होता. तसेच राजस्थानलाही मुलींना व्यवस्थीत दर्जा नसल्यानं कित्येक मुली भ्रृणहत्या करुन मारल्या होत्या. तीच मंडळी महाराष्ट्रात तसेच विदर्भात येत. कधी गाई घेवून तर कधी आपली मेंढरं घेवून. त्यांच्या महिला पायघोळ अंगरखा घालत. त्या आपल्या अंगरख्यामध्ये लहान लहान एकट्या तिकट्या मुलींना लपवून त्यांचं अपहरण करीत. आज तसा प्रकार दिसत नाही.
लोकं त्यांच्या या वृत्तीमुळं तृप्तीलाही समजवीत असत. तिनं असं जावू नये. पण पोटच ते. ती जाणार नाही तर काय? शिवाय घरी विश्वकोटीचं दारिद्र्य होतं. त्यामुळं तिला जावंच लागायचं.

श्रीकर हा तिचा पती. हा मुलगा तिला पाहायला आला होता. पहिलाच मुलगा तो. ती खुश झाली होती. कारण त्यानं अटीमध्ये कोणत्याच गोष्टीची मागणी केली नव्हती.
तसं पाहता त्यावेळी हुंड्याचीही प्रथा अस्तित्वात होती. समाजात बक्कळ हुंडा होता. लोकं हुंडा मागत होते. हुंड्याची कुप्रथा तीव्र असल्यामुळं तृप्तीचा विवाह जुळला नव्हता. पण श्रीकरनं हुंडा न मागीतल्यानं ती खुश होती.
विवाह जुळला तर खरा. अटी काहीच घातल्या नव्हत्या तेही खरं होतं. पण विवाह करायला लागणारा पैसा. तो कोठून आणायचा? मायबाप गरीब. खायची ऐपत नाही. काय करावे? तृप्तीला प्रश्न पडत होते. त्यामुळं दिवसेंदिवस ती चिंतीत होत होती.
घरी मायबापाची शेती होती. शेती फारशी पीकत नव्हती. ह्या शेतीला पीकवीता पिकवीता नाकी नव येत होते. पण माऊचीच ती. कोणी विकतात का आपल्या आईला. तर तिचा बाप जमीन विकणार. त्याची शेती आधीपासूनच गहाण होती. त्यामुळं शेतीवर कितीसा पैसा मागणार. अशातच विवाहाची तारीख निघाली.
विवाह तो…….. लोकांचे देणे घेणे आले. जावयाला कपडेलत्ते आले. जावयानं हुंडा मागीतला नाही. म्हणून काय झालं. जावयानं अटी टाकल्या का? नाही ना. मग जावयाला काही द्यावंच लागेल. त्यांच्या पाहूण्यांना काही खायला घालावंच लागेल. असा विचार सांजच्याला घरी तृप्तीसमोर होत होता. तृप्ती ते सगळं ऐकत होती. ते ऐकून व्यथीतही होत होती. काय करावं ते सुचत नव्हतं. तशी तीही कामाला जात होती.
लग्नाची तारीख जवळ येत चालली होती. तसतशी तृप्तीच्या मनात विवाहाबाबत धडकी भरत होती. मायबापाची चिंता फारच वाढली होती. ती चिंता त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती. ते मायबाप कुठल्याही मार्गानं पैसा मागायला तयार होते. पण पैसा जुळत नव्हता. अशातच विवाहाचा दिवस आठ दिवसावर येवून ठेपला.
विवाहाला आठ दिवसच पाहिजे ते बाकी राहिले होते.पत्रीका कशाबशा छापल्या होत्या. त्या वाटूनही झाल्या होत्या. पण बाकीचा खर्च. त्यासाठी पैसा नव्हता.
विवाह म्हटला तर कपडे आले. मंडप आला. डीजे आला. त्यातच दागदागीनेही आले. शिवाय व-हाड्यांना जेवन चारणंही आलंच. आज जेवनाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास हळद जेवन, कथेचं जेवन आलंच. शिवाय आंदण, ऐर यातही पैसा जात असतो. ऐराच्या वेळी तर चांगले चांगले जवळचे नातेवाईक रुसतात. यात मुली जर असतील, तर कमीतकमी लाखाच्या वर पैसा लागतो. तसेच मुलाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास बग्गी किंवा घोडा, वाजा, येण्याजाण्याला गाड्या, हळद जेवन, कथेचं जेवन, मुलीचे कपडे, तिचं सोननाणं किराणा माल आदि खर्च लागतो. आजच्या काळात विवाह करणं सोपं राहिलेलं नाही. तसेच महत्वाचं म्हणजे एखाद्यानं विवाह करतांना पाहूण्यांची गैरसोय केलीच तर पाहूणे वेगळी बदनामी करतील अशी वाटणारी लाज. ही लाजच कधीकधी माणसाचा जीव घेत असते. तृप्तीच्याही बाबतीत तेच घडलं होतं.
विवाह जवळ आला असला तरीही तिच्या कुटूंबाजवळ पुरेसा पैसा गोळा झालेला नव्हता. तृप्ती तोच विचार करीत होती. आता पाहूणे येणार. वाईट वाईट बोलणार. आपली लाज काढणार वैगेरे चित्र विचित्र प्रश्न तिच्या मनात होते. शेवटी तिनं निर्णय घेतला. आपण जगायलाच नको. आपणच राहणार नाही तर विवाहाचा विषय कसा राहणार? आपल्या मायबापाची बदनामीही होणार नाही.

रात्र झाली होती.सर्वजण शांत आणि गाढ झोपले होते. पण तृप्ती काही झोपली नव्हती. ती जागत होती. कारण तिच्यासाठी काळ अगदी वैतागून आला होता.
अर्धी रात्र उलटली होती. ती उठली. तिनं घरात दोर शोधला. त्यातच तो दोर छताला बांधला. एक रुमाल घट्टपणे तोंडाला बांधला. त्यानंतर तिनं एक प्लास्टीक स्टूल घेतला.त्यावर ती उभी झाली. त्यानंतर तो दोर तिनं गळ्यात टाकला. एक चिठ्ठी खिशात टाकली. त्यात लिहिलं होतं. विवाहासाठी आमच्याजवळ पैसा गोळा न झाल्यानं मी आत्महत्या करीत आहे. क्षणात तिनं स्टुलवरुन उडी मारली व पलक झपकते न झपकते तोच ती गतप्राण झाली.
तृप्ती मायबापाची एकुलती एक मुलगी. सकाळी सकाळी आई उठली. तिनं छताला बांधलेल्या दोराला तृप्तीला पाहिलं. तिची बाहेर निघालेली जीभ पाहिली. तिचा विश्वासच बसेनासा झाला. ती तिला बिलगली. ओक्साबोक्सी रडू लागली. तोच ते आवाज ऐकून तिचा बाप उठला. त्यानंही ते दृश्य पाहिले. तोही रडू लागला. तसं ते ओरडणं पाहून आजूबाजूची मंडळीही जागी झाली. त्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. तोच त्यांना ते दृश्य दिसलं. तीही हळहळायला लागली. कोणीतरी पोलिसांना फोन लावला. पोलिस आले. तपास झाला. तपासाअंती त्याचं खापर निरपराध असलेल्या तिच्या पतीवर फोडण्यात आलं. पोलिसांनी श्रीकरचा गुन्हा नसतांनाही आत्महत्येला उकसविण्याच्या कारणात गोवलं व त्याला पकडून तुरुंगात टाकलं.
तृप्तीचा अंत्यविधी पार पडला. सगळी मंडळी आपल्या आपल्या घरी गेली. त्याचबरोबर तृप्तीचे मायबाप आपापसात चर्चा करु लागले. तेही आपली तृप्तीच नाही तर आपणही जगून काय करु असा विचार करु लागले. त्यातच तोच काळा दिवस उजळला. बापानं शेतात वापरण्याचं एंन्ड्रोसल्फान घेतलं. ते पत्नीला एका कपात दिलं. आपणही एका कपात ओतलं व दोघांनीही एकाच वेळी डोळे मिटले आणि त्या डोळ्यांना साक्षी न ठेवता त्यांनी तोंडाला एंन्ड्रोसल्फान लावलं.
काही वेळ दोघांनाही उचक्या आल्या. पण त्यांनी कोणतीच आरडाओरड केली नाही. वा कोणाला बोलावलं नाही. क्षणातच त्यांनी जीवनयात्रा संपवली.
ती शेती, तो विवाह जागच्या जागीच राहिला. विवाहाच्या अनावश्यक गरजेनं आज तिघांचेही बळी घेतले होते. लाजलज्जा जागेवरच राहिली होती. एवढंच नाही तर या आत्महत्येनं निरपराध श्रीकरलाही गोवले होते खुनाच्या खटल्यात. ज्याच्या या विवाहात कोणताच गुन्हा नव्हता. ते तृप्तीला मिळालेलं असं सौंदर्य आज कुचकामाचं ठरलं होतं.

Related posts