उस्मानाबाद 

लातूर जिल्ह्यातील ऊस ऊत्पादक शेतकरी संभ्रमात..बंद कारखाने सुरू होणार काय ? शेतकऱ्यांपुढे मोठं आव्हान.

लातूर / वैभव बालकुंदे
लातूर जिल्ह्यातील ऊस क्षेत्रात झालेली वाढ आणि बंद अवस्थेतील साखर कारखाने यामुळे यंदा ऊस ऊत्पादक शेतकरी संभ्रमात आहेत. अद्याप गळीत हंगाम सूरू झाला नसला तरी आपला ऊस वेळेत गाळपासाठी जाईल की नाही असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सतावतो आहे.
लातूर सर्वाधीक ऊस उत्पादन घेणारा जिल्हा अशी ओळख आहे. मात्र अल्प पर्जन्यमानामुळे ऊस क्षेत्र कमालीचे घटले होते. सलग दोन वर्ष चांगला पाऊस झाल्याने यंदा 26 हजार हेक्टरवर ऊस आहे. सात हजार हेक्टर क्षेत्राची वाढ झालेली असली तरी जिल्ह्यातील 12 साखर कारखान्यापैकी किती कारखाने सुरू होणार याकडे आता लक्ष लागले आहे. मांजरा परिवारातील मांजरा, विकास, रेणा, विकास 2, जागृती, ट्वेंटी वन कारखान्यांसह सिध्दी कारखाना सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर अवसायनातील किल्लारी, जयजवान, मारूती महाराज, शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना व अर्थिक स्थितीअभावी पन्नगेश्वर ही साखर कारखाने सुरू होण्याची शक्यता धुसर होत चालली आहे. शासनाकडून कर्ज पुरवठा झाल्यास मारूती महाराज कारखाना सुरू होऊ शकतो अशी स्थिती आहे.
अवसायनातील नळेगाव , बेलकुंड , अंबुलगा आणि किल्लारी साखर कारखाने हे अखेरची घटका मोजत आहेत. या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात असलेला ऊस इतर कारखान्यांना द्यावा लागणार आहे. बंद अवस्थेतील कारखाने सूरू करण्यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. मात्र राजकीय इच्छाशक्ती अभावी हे कारखाने सुरू होऊ शकले नाहीत असा आरोप आता ऊस उत्पादक शेतकरी करत आहेत …
जिल्ह्यातील जवळपास 26 हजार हेक्टरवरील ऊसाचे गाळप होण्यासाठी अनेक साखर कारखान्यांची धुराडे पेटावी लागणार आहेत. मात्र किती साखर कारखाने सुरू होतील याविषयी अनिश्चितता आहे. नेहमीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना यंदा तरी ऊसाचे वेळेवर गाळप होऊन दिलासा मिळेल ही अपेक्षा आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील आजारी साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ लातूर जिल्ह्यातील किती साखर कारखान्याना होतो हे पहाणे औचित्याचे ठरणार आहे.

Related posts